मुक्तपीठ टीम
अवघ्या पाच मिनिटे आणि ५१ सेकंदात शिवतांडव व महिषासुरमर्दिनी स्तोत्र पठणाचा विश्वविक्रम करणाऱ्या पुण्यातील संस्कार ऋषिकेश खटावकर याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरव केला. मंत्रालयात झालेल्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी संस्कारचा सत्कार करत त्याच्या विक्रमाचे कौतुक केले. प्रसंगी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासह संस्कारचे वडील ऋषिकेश खटावकर आदी उपस्थित होते.
शिवाजीनगर येथील मॉडर्न प्री-प्रायमरी स्कूल मध्ये तिसरीत शिकणाऱ्या संस्कारने नुकतीच ही विक्रमी कामगिरी केली. त्याच्या या विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यामध्ये घेण्यात आली आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् तीन मिनिटे सात सेकंदात पठण करीत त्याने केरळच्या मुलीचा तीन मिनिटे ४४ सेकंदाचा विक्रम मोडला.
ऋषिकेश खटावकर म्हणाले, “महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् आणि शिवतांडव स्तोत्र बोलण्यास कठीण आहेत. मात्र, आम्ही गेली तीन वर्षे तयारी करत होतो. कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे आम्हाला अधिक वेळ मिळाला. त्याची आई मोनिका ऋषिकेश खटावकर यांनीही त्याचे चांगले पाठांतर करून घेतले.”