मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते स्पष्ट भूमिका मांडत आहेत. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही संजय राऊतांप्रमाणेच,”जे होईल ते होईल, सत्ता जाईल, पण नको ती तडजोड करणार नाही.” अशी भूमिका मांडली आहे. दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी केलेलं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवणारं ठरलं आहे. त्यांनी दिलेला विधानसभा बरखास्तीचा इशारा आघाडीला पावणारा ठरेल की भोवणारा त्यावर चर्चा रंगत आहे.
संजय राऊतांचा ट्वीट इशारा!
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
- शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट केले की, “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी विधानसभा बरखास्त करण्याकडे वाटचाल करत आहे…”
- त्याचा अर्थ असा की आघाडी सरकार घालवताना विधानसभाच बरखास्त झाली तर तुमच्याही सर्वांची आमदारकी धोक्यात येईल.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे.
- त्या बैठकीनंतर ते राजीनामा देण्याची चर्चा आहे.
काय घडेल, काय बिघडेल?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, भाजपाचं किंवा भाजपाच्या बाहेरून पाठिंब्यानं एकनाथ शिंदेंचं सरकार सत्तेत आलं तरी ते जास्त टिकणार नाही, राजकीय अस्थिरतेच्या परिस्थितीत विधानसभा बरखास्ती अटळ असेल, तुमची आमदारकी जाईल, असा इशारा देत आमदारांना सावध करत आपल्या पक्षाकडे ठेवण्याचा संजय राऊतांचा हेतू असावा. पण तसंच घडेल असं नाही.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि विधानसभा बरखास्तीची शिफारस केली तरी राज्यपाल तसे करतील असे नाही.
- तसेच उद्धव ठाकरेंच्या विधानसभा बरखास्तीच्या प्रस्तावाशी आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सहमत असतील, असे नाही.
- तसेच अशावेळी सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी भाजपा पुढे सरसावणारच नाही, असेही नाही.
- उलट यामुळे सध्या कुंपणावर असलेले शिवसेनेचे, आघाडीच्या गोटातील इतर काही आमदार विधानसभा बरखास्ती टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही.