मुक्तपीठ टीम
देशातल्या वाढत्या महागाईवरून शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून संताप व्यक्त केला गेला आहे. वाढत्या महागाईवरून सामनाने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची खिल्ली उडवली आहे. आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, पण निदान महागाईची जुमलेबाजी तरी करू नका.
सरकारी कागदावर महागाईचा दर घटला असेलही, पण वास्तवातील दरवाढीचा आकडा रोज वाढतच चालला आहे त्याचे काय? २०२२ मध्ये भारताचा विकास दर जगात सर्वाधिक होणार असेल तर त्याचा आनंद सगळ्यांनाच होईल. पण आता सामान्य माणसाला प्रचंड महागाईचे जे चटके बसत आहेत त्याचे काय? असा संतप्त सवाल सामनातून करण्यात आला आहे.
सरकारी कागदावर आकड्यांची तलवारबाजी नेहमीच सुरू!
- ‘पोटाची खळगी कशी भरायची, कोरोनाच्या संकटात दरवाढीचा भडिमार कसा सहन करायचा या विवंचनेत सामान्य माणूस आहे.
- सरकार मात्र कागदावर कमी झालेल्या महागाईची ‘गाजरे’ खुशीत खात आहे.
- त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताची अर्थव्यवस्था या वर्षी ९.५ टक्के दरानं वाढणार, २०२२ मध्ये विकास दरात भारत जगाला मागे टाकणार, असं आणखी एक ‘गाजर’ दाखवलं आहे.
- हीदेखील एक प्रकारची आकडेबाजीच आहे. पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ आहे.
- तो त्यांचा प्रश्न आहे, पण निदान महागाईची जुमलेबाजी तरी करू नका.
- सरकारी कागदावर महागाईचा दर घटला असेलही, पण वास्तवातील दरवाढीचा आकडा रोज वाढतच चालला आहे त्याचे काय?
- २०२२ मध्ये हिंदुस्थानचा विकास दर जगात सर्वाधिक होणार असेल तर त्याचा आनंद सगळय़ांनाच होईल.
- पण आता सामान्य माणसाला प्रचंड महागाईचे जे चटके बसत आहेत त्याचे काय?
इंधन दरवाढीचे नेहमीचेच चटके!
- पेट्रोल-डिझेलप्रमाणे सीएनजी-पीएनजी गॅसच्या दरवाढीचे सत्र सुरू
‘पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ रोज नवनवे विक्रम करीत आहे. - स्वयंपाकाचा गॅसदेखील या दरवाढीच्या शर्यतीत मागे नाही.
- पेट्रोलपाठोपाठ डिझेलनेही आता प्रति लिटरमागे शंभरी ओलांडली आहे.
- घरगुती गॅसचे दर मजल-दरमजल करीत एक हजार रुपयांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहेत.
- सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही आता बुधवारपासून वाढ झाली आहे.
- मागील दहा दिवसांतील ही दुसरी आणि आठ महिन्यांतील पाचवी दरवाढ आहे.
- म्हणजे पेट्रोल-डिझेलप्रमाणे सीएनजी-पीएनजी गॅसच्या दरवाढीचे सत्रदेखील सुरूच आहे.
- इंधन दरवाढीमुळं बाजारात सर्वच वस्तूंचे दर काही महिन्यांपासून चढेच आहेत.
महागाईचा वणवा आभासी?
- सामान्य माणसाचं त्यामुळं कंबरडं मोडलं आहे आणि सरकार महागाई घटल्याचं सांगतंय.
- असं असेल तर मग बाजारात जी दरवाढ आणि महागाई दिसते आहे ते काय आहे?
- ‘सध्याच्या इंटरनेट मायाजालाच्या भाषेत हा महागाईचा वणवा ‘आभासी’ आहे आणि लोक, विरोधी पक्ष उगाच त्याचा बागुलबुवा उभा करीत आहेत असं केंद्रातील सरकारला म्हणायचं आहे का?