मुक्तपीठ टीम
राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना अखेर न्याय मिळाला आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत हा कार्यभार अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे होता. शनिवारी त्यांनी पोलीस मुख्यालयात पदाची सूत्रे स्वीकारली. कडक शिस्तीचा करारी आणि कोणताही दबाव न मानणारा अधिकारी म्हणून संजय पांडे ओळखले जातात.
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या स्फोटक गाडी प्रकरणातील सचिन वाझेंचा सहभाग, माजी पोलीस आयुक्त परमीबीर सिंह यांनी केलेले आरोप, त्यांच्यावर इतर अधिकाऱ्यांनी केलेले आरोप यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहचल्याचे मानले जाते. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवल्याचे मानले जाते.
काय असू शकतो संजय पांडे यांचा अजेंडा:
पोलीस महासंचालक संजय पांडे यांना ओळखणाऱ्यांच्या मते त्यांचा अजेंडा महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा पूर्वीसारखीच झळाळून यावी असे असतील:
- सामान्य नागरिकांसह समाजातील इतर सर्व घटकांचा पोलिसांवर विश्वास वाढेल, अशी पावले उचलण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक कार्यप्रणाली, प्रसंगी शासनाच्या सहकार्याने काही सुधारणांची पावले उचलली जाऊ शकतात.
- महाराष्ट्र पोलीस हा देशातील एक आघाडीचा फोर्स आहे. त्याचा लौकिक कायम राहील, यासाठी नवे पोलीस महासंचालक खास प्रयत्न करतील.
- नियमबाह्य, अनिष्ट प्रथा मोडीत काढण्यावर भर दिला जाईल, त्यासाठी शासनाच्या संमतीने कठोर निर्णय घ्यावे लागले तरी त्यात ते कुचराई करणार नाहीत.
- सर्व अधिकारी व कर्मचारी समन्वयाने काम करून महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक कायम राखतील.
- संजय पांडे यांची प्रामाणिक अधिकारी अशी ओळख आहे. पोलीस हा कायदा आणि समाजाचा रक्षक असतो, ती प्रतिमा कायम राखण्यावर त्यांचा भर असतो, आताही असेल.
- चांगल्या हेतूने काम करताना चुका झाल्यास, ते समजवून घेतात, मात्र, कुणी बेशिस्त वर्तन करून खात्याची बदनामी करत असल्यास ते कदापि खपवून घेणार नाहीत.
- सर्वात महत्वाचे परमबीरसारख्या अधिकाऱ्यांवर असलेल्या आरोपांची योग्य चौकशी करून ते पोलीस दलात स्वच्छता मोहीम राबवू शकतील.