मुक्तपीठ टीम
नदी उत्सवांतर्गत महाराष्ट्रातील कृष्णा, गोदावरी, तापी, भीमा व पंचगंगा या प्रमुख नद्यांचा समावेश आहे. या नद्यांच्या काठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठावर नदी घाटाच्या स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. माईघाट, सांगली येथे सांगली पाटबंधारे मंडळ व सर्व शासकीय यंत्रणांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
कृष्णा काठावरील माईघाट येथे स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता मिलींद नाईक यांच्याहस्ते कलश पुजन करुन करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, सचिन पवार, सुर्यकांत नलवडे, अभिनंदन हारुगडे, राजन डवरी, महेश रासनकर, महानगरपालीका उपायुक्त नितीन शिंदे व जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थेतील ४५० स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते.
यावेळी अधीक्षक अभियंता मिलींद नाईक यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग घेण्याचे अवाहन केले.
कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी नदी उत्सवाची रुपरेषा सांगून कृष्णामाईचा सर्वसमावेशकपणा, संथता हे नदीचे सर्व गुण आपण अंगीकृत करावेत, असे अवाहन करुन कार्यक्रमाची सुरवात केली. या कार्यक्रमामुळे एकूणच सकारात्मक वातवरण तयार झाले. अशा प्रकारचे कार्यक्रम वर्षातुन दोन ते तीन वेळा राबविण्यात यावे अशी सर्वसामान्य नागरीकांनी विनंती केली.