मुक्तपीठ टीम
४२ नवगीतांमधून साकारलेले धगधगते शिवचरित्र, कर्तृत्ववान मावळ्यांचा इतिहास, लढाया… ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल २०२२’मध्ये हा जाज्वल्य इतिहास सादर होणार आहे. महाराष्ट्र पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतुन साकार होत असणाऱ्या या ३ दिवसीय उत्सवाच्या उदघाटना दिवशीच २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम साकार होणार आहे. ४२ नवगीतांच्या माध्यमातून छत्रपती शिवराय आणि त्यांच्या महापराक्रमी योद्ध्यांना ‘स्वर’सुमनांजली वाहण्यासाठी ‘सईशा फाऊंडेशन मुंबई’ निर्मित व प्रस्तुत ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पँडेमिकनंतर प्रथमच कलाकार रसिकांसमोर त्यांची कला भव्य प्रमाणात सादर करणार आहेत. गीतगायन, नृत्यकला, गोंधळ, शिवकालीन शस्त्रांचे प्रात्यक्षिक आणि चलचित्रांसहीत २५ कलाकारांच्या साथीने शिवगाथेतील नवगीतांचे सादरीकरण होणार आहे. तसेच यावेळी ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त एका विशेष नवीन गीताचे लोकार्पण करण्यात येईल.
शिवजन्म, स्वराज्याचे तोरण, वीर बाजीप्रभू देशपांडे, साल्हेर किल्ला, प्रतापगड युद्ध, महाराजांची आग्रा भेट, स्वराज्याचे आरमार, शिवराज्याभिषेक आणि अशी अनेक स्फूर्तिदायी गीते सादर होणार आहेत. ”शिवचरित्रातून राष्ट्रनिर्मिती हा या ऐतिहासिक संगीतमय कार्यक्रमाचा ध्यास आहे. स्वराज्याच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या लढाई, महाराजांची दूरदृष्टी, आरमार दल… इतिहासातील प्रत्येक क्षणावर प्रकाश टाकणारे सादरीकरण करण्यात येईल. राष्ट्रप्रेरणेने निर्मिलेल्या या अनोख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला अधिकाधिक तरुणांपर्यंत प्रेरणादायी इतिहास पोहचवायचा आहे.” असे कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका, निवेदिका पद्मश्री राव म्हणाल्या.
”अगदी निःस्वार्थपणे प्रत्येक मावळा आणि त्यावेळची जनता स्वराज्यासाठी लढली. जीवाची, घरादाराची पर्वा न करता शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. शिवकाळातील प्रत्येक लढाई, गडकिल्ले, स्फूर्तिदायी प्रसंग यांची माहिती… व त्यातूनच मिळणारी प्रेरणा सर्वांपर्यंत पोहचावी आणि राष्ट्रीय चारित्र्य निर्माण व्हावे हाच आमचा हेतू आहे. गेल्या १२ वर्षांपसून सुरू असणार्या आमच्या या कार्यात डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर असे विविध क्षेत्रातील लोक स्वयंप्रेरणेने जोडले गेले आहेत.” असे ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’चे लेखक अनिल नलावडे म्हणाले.
या कार्यक्रमात ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त सादर होणारे नवगीत येत्या २७ फेब्रुवारी रोजी युट्युब व इतर माध्यमांवरवर प्रसिद्ध होईल.
संपुर्णपणे मायबोली मराठीला वाहिलेली अशी ही गीतरचना व त्याचे संगीत अनिल नलावडे यांचे असून गायक केतन पटवर्धन व दीप्ती आंबेकर यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे.
पाहा व्हिडीओ: