मुक्तपीठ टीम
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मधील कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी संपणार आहे. ते मुदवाढीसाठी इच्छुक नसल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. सरकारी सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली. वानखेडे, २००० बॅचचे IRS अधिकारी, सप्टेंबर २०२० पासून NCB मध्ये प्रतिनियुक्तीवर आहेत आणि ते अमली पदार्थ विरोधी एजन्सीचे मुंबई विभागीय संचालक आहेत. याआधी ते महसूल गुप्तचर संचालनालयात (डीआरआय) होते. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वादामुळे समीर वानखेडे मुदतवाढ घेऊ इच्छित नसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कथित आत्महत्येनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर म्हणून वानखेडे ड्रग सिंडिकेटविरुद्धच्या कारवाईत गुंतले होते. या सिंडिकेटमध्ये बॉलीवूड कलाकारांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. या प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले, ज्यामुळे वानखेडे अडचणीत सापडले. त्यामुळे एनसीबीकडून आर्यन खान प्रकरणाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आली.
महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर आक्षेप घेत त्यांचा (वानखेडे) जन्म मुस्लिम कुटुंबात झाला, परंतु बनावट जात प्रमाणपत्र मिळवून अनुसूचित जाती आरक्षणाखाली नोकरी मिळवली, असा आरोप केला आहे. वानखेडे यांनी आरोप फेटाळून लावले आणि त्यांच्या वडिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते मलिक यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला. एनसीबीमधील प्रतिनियुक्ती संपल्यानंतर वानखेडे यांची नेमणूक कुठे होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे सूत्रांनी सांगितले.