मुक्तपीठ टीम
बियाणांची आणि खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून राज्यातील आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. ही लूट न थांबल्यास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना व सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना फिरू देणार नाही, असा इशारा भाजपा नेते संभाजी निलंगेकर पाटील यांनी बुधवारी दिला. बियाणांच्या खरेदीत शेतकऱ्यांना बसलेला भुर्दंड राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा, अशी मागणीही निलंगेकर यांनी यावेळी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत निलंगेकर बोलत होते. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, उत्तर भारतीय मोर्चा चे अध्यक्ष संजय पांडे यावेळी उपस्थित होते.
निलंगेकर यांनी सांगितले की, राज्यात खरिपाच्या पेरण्या चालू आहेत. मात्र बियाणांच्या, खतांच्या टंचाईमुळे शेतकरी हैराण झाला आहे. कृत्रिम टंचाईमुळे राज्यात बियाणांचा, खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार चालू आहे. खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी आघाडी सरकारकडून बियाणांची आणि खतांची टंचाई निर्माण केली जात आहे. २२०० रु. किंमतीच्या सोयाबीनच्या बियाणांच्या बॅगची ३५०० ते ४हजार रुपयांना विक्री होत आहे. राज्याला सोयाबीनच्या ११ लाख ५० हजार क्विंटल बियाणांची गरज आहे. मात्र राज्यात महाबीज चे फक्त २ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. परिणामी शेतकऱ्यांना चढ्या किंमतीने सोयाबीनच्या बियाणांची खरेदी करावी लागते आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना ५३ लाख मे. टन खतांची गरज आहे. मात्र बाजारात फक्त २२ लाख टन एवढेच खत उपलब्ध आहे. राज्यातील आघाडी सरकारच्या आशीर्वादाने बियाणांप्रमाणे खतांचाही मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु आहे. या सारखे विषय विधिमंडळ अधिवेशनात चर्चेस येतील म्हणूनच राज्य सरकारने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन फक्त २ दिवसांचेच ठेवले आहे. शेतकऱ्यांची ही लूट न थांबल्यास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना, सत्ताधारी लोकप्रतिनिधींना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.