मुक्तपीठ टीम
कोरोनाचा संकट काळ. त्यात मे महिन्याचं कडक ऊन. जीवाची काहिली होत असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावर अविरत विकास कार्य सुरुच असतं. रायगड प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी अथक परिश्रम घेत असतात. कोरोना संकटात प्रतिकुल परिस्थितीतही रायगडावरील या शिवसेवकांना क्षणाची उसंत नाही. त्यामुळेच त्या विकास कार्याच्या देखरेखीसाठी आणि पाठीवर प्रेमाची थाप मारण्यासाठी थेट पोहचले खासदार संभाजी छत्रपती.
छत्रपती संभाजीराजे सोमवारी सकाळी कोल्हापूरहून रायगडास निघाले. साधारण १२ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर नाणे दरवाजामार्गे गड चढून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. लॉकडाऊनमुळे रोपवे बंद आहे, अशा परिस्थितीत प्राधिकरणाचे अधिकारी दररोज गड पायी चढतात. रखरखत्या ऊन्हात देखील गडावरील सर्व कामे अविरतपणे सुरू आहेत. रायगड प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग घेत असलेल्या मेहनतीस प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे नेहमी प्रयत्नशील असतात. वेळोवेळी रायगडास भेट देऊन सुरू असलेल्या कामांवर लक्ष देत असतात. तसेच ते सोमवारी किल्ले रायगडावर पोहचले.
रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष झाल्यापासून संभाजी छत्रपती महिन्यातून किमान दोन तीन वेळा तरी गडावर जातातच जातात. रायगडावर झालेला विकास पाहून डोळे भरून येतात. गडकोटांकडे आजवर अनेकांनी दुर्लक्ष केले, पण सध्या गडकोटांसाठी जे काम सुरु आहे, ते पाहून शिवप्रेमी अभिमान व्यक्त करतात. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे रायगडावरील काम ठिगळं जोडल्यासारखं वाट्टेल तसं नाही, तर रायगडाला शोभावं असंच सुरु आहे. अभिमानाचा वारसा…अभिमान बाळगावा असाच जपला जातोय.
पाहा व्हिडीओ: