मुक्तपीठ टीम
मुंबईतील साकीनाका भागात अमानुष अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अवघ्या १८ दिवसात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत पोलिसांनी ७७ जणांचे जबाब नोंदवले. सखोल तपासानंतर ३४६ पानांचे आरोपपत्र दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल केलं आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांची ही कामगिरी फास्टट्रॅक असल्यानं आता फास्टट्रॅक न्यायालयातही अशीच सुनावणी होऊन नराधमाला अद्दल घडवली जावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पोलिसांची फास्टट्रॅक कामगिरी!
- गणेश चतुर्थीच्या दिवशी साकीनाका येथे घडलेल्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला होता.
- मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांसोबत बैठक घेत तपास जलद गतीने करण्याचे आदेश दिले होते.
- तसेच पोलिसांनीदेखील लवकरात लवकर तपास पूर्ण करू असे आश्वासन दिले होते.
- त्यानंतर आता पोलिसांना अवघ्या १८ दिवसांत या प्रकरणाचा तपास केला आहे.
- पोलिसांनी आतापर्यंत ७७ जणांचे जबाब नोंदवला आहे.
- जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी दिंडोशी न्यायालयात तब्बल ३४६ पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
- या प्रकरणात वैद्यकीय, भौतिक आणि रासायनिक असे सर्व पुरावे जमा करून तपास पूर्ण करण्यात आल्याचं पोलिसांच्या या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
आरोपीने केला गुन्हा कबुल
साकीनाका बलात्कार प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्रकार परिषद घेत आरोपीने गुन्हा कबुल केल्याची माहिती दिली. तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितले.