मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी दैनिक सकाळचे प्रकाशक सकाळ मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आयोजित सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार सोहळा नुकताच ठाण्यात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात एकाच वेळी एकाच मंचावर पालघर जिल्ह्यातील झडपोली गावातील सांबरे माता आणि पुत्र यांना सन्मानित करण्यात आले. शेतकरी कुटुंबातून आलेले व्यावसायिक निलेश भगवान सांबरे यांना सकाळ सन ऑफ सॉइल पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर त्यांच्या मातोश्री भावनादेवी भगवान सांबरे यांना सकाळ मदर हू इन्स्पायर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सकाळ हा महाराष्ट्रातील गौरवशाली परंपरा असलेला माध्यम समूह आहे. या समूहाच्यावतीने सकाळ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण व सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे साहेब यांना सकाळ सन ऑफ सॉइल (sakal sun of soil) व अध्यक्षा सौ. भावनादेवी भगवान सांबरे (आई) यांना मदर हू इन्स्पायर (Mother Who Inspire) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी अनेक प्रमुख अतिथी व मान्यवर उपस्थित होते.
मुलाला अवघ्या समाजाच्या कुटुंबाची जबाबदारी देणारी आई!
आईनं मुलांवर असे संस्कार करावे की फक्त तिलाच नाही तर अवघ्या समाजासाठी ते आधारवड ठरतील. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावातील भावनादेवी भगवान सांबरे अशाच आईंपैकी.
जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या आई सौ.भावनादेवी भगवान सांबरे झडपोली येथील रुग्णालय व सी.बी.एस.सी स्कूल,यू.पी.एस.सी,एम.पी.एस.सी.अकॅडमी चालवतात. त्या या संस्थांच्या प्रत्येक कामात जातीनं लक्ष घालतात. रुग्ण,नर्स,वॉर्ड बॉय, विद्यार्थी, शिक्षक, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी कर्मचारी यांची काळजी घेतात. रुग्णाची आपुलकीनं विचारपूस करतात. त्यांना मानसिक आधार देत असतात. जेवणाची गैरसोय असेल तर त्या घरून डबाही पाठवतात. यातून येते एका निलेश सांबरेंच्याच नाही तर अवघ्या समाजाची त्या आई असल्याची प्रचिती…
आभाळाएवढं मोठा होताना पाय जमीनीवरच ठेवावेत! – निलेश सांबरे
निलेश भगवान सांबरे हे फक्त एक नाव नाही तर एक मंत्र झाला आहे. सामाजिक बांधिलकीचा. शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि शेती सुधाराची पंचसुत्री सांगणाऱ्या “जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे” संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे आज समाजहितासाठी परवलीचा शब्द झाला आहे. ठाणे -पालघर जिल्ह्यावर, कोकणावर वा महाराष्ट्रावर कुठलेही संकट असो… हा माणूस मदत कार्यासाठी सदैव पुढेच असतो..!! मग तो सांगली- कोल्हापुरचा महापूर असो वा कोकणातील महापूर असो.
कोरोना संकटकाळात प्राणांची पर्वा न करता जिजाऊचे स्वयंसेवक सेवाकार्यात उतरलेच पण स्वत: निलेश सांबरेही पुढे सरसावले. आदिवासी, शेतकरी यांच्या दुर्गम भागात आठ सीबीएसई शाळा, झडपोली गावात १०० खाटांचे भगवान महादेव सांबरे रुग्णालय, दृष्टीहीन दिव्यांगांसाठी निवासी शाळा, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना मोफत फळझाडं, विद्यार्थ्यांना दरवर्षी किमान २५ लाख वह्यांचे वाटप. एक नाही असे अनेक उपक्रम निलेश सांबरे राबवतात. जिजाऊचे हे सारे उपक्रम स्वकमाईतून चालतात, ही खास बाब.
सर्वात महत्वाचं म्हणजे मदतीसाठी हाक कुणाचीही येवो निलेश सांबरे आजही मदतीला धावतात…त्यांचं कारण त्यांच्याच शब्दात सांगायचं तर आभाळाएवढं मोठं व्हायचंच…पण पाय मात्र आपल्या मातीतच रोवून ठेवायचे!