मुक्तपीठ टीम
किल्ले जीवधन म्हणजे ईसवीसनपूर्व काळापासून नाणेघाटाचा संरक्षक दुर्ग म्हणून परिचित असलेला, भटक्या मंडळींचा आवडतं ठिकाण असलेला किल्ला. गडाच्या कल्याण दरवाजाचा पायरी मार्ग शेकडो वर्षे दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता. ऊन वारा पाऊस यांचा मारा खात मोकळं होण्याची वाट पाहत होता. ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या माध्यमातून खास मोहीम राबवली गेली. अनेक दिवसांच्या परिश्रमानंतर जीवधन गडावरील पायरी मार्ग संवर्धन मोहीम अखेर पूर्णत्वास गेली आहे.
‘स्वराज्याचे प्रवेशद्वार’ या उपक्रमाच्या अंतर्गत ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या माध्यमातून गडाला लाकडी दरवाजा बसविण्याचे काम केले जाते. त्यासाठी गडावर जेव्हा माप घेण्यासाठी सह्याद्रीचे दुर्गसेवक जीवधन गडावर नोव्हेंबर महिन्यात गेले होते. तेथे गेले असता त्यांना गडाच्या दरवाजामध्ये असलेला दगडांचा अन मातीचा खच मोकळा केल्याशिवाय दरवाजा बसवता येणार नाही हे दिसून आले. त्यामुळे १४ फेब्रुवारी २०२१ पासून पायरी संवर्धन कामाचा श्रीगणेशा झाला. सलग ९ महिने अतोनात मेहनत घेत रात्रीचा दिवस अन दिवसाची रात्र करत अनेक जिवलग सह्याद्रीचे दुर्गसेवक कष्ट करत होते. शेकडो वर्षाचा गाडलेला पायरी मार्ग मोकळा करण्यासाठी झटत होते.
स्वराज्याची दौलत जपण्यासाठी झटत होते. स्वतःचं कर्तव्य म्हणून कार्य करत होते. दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी दगडांचा खच उचलून मोहिमेची सांगता करण्यात आली. या वेळी आपल्या पूर्वजांची परंपरा जपत भंडारा उधळण्यात आला.
ही पूर्ण पायरी संवर्धन मोहीम यशस्वी करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमी विभागाचे सर्वात मोठे योगदान आहे. त्याच बरोबर अकोले तालुका, शिरूर तालुका, पुणे शहर, पिंपरी चिंचवड, खेड तालुका, संगमनेर तालुका, सोलापूर जिल्हा, मुंबई व ठाणे जिल्हा या विभागाचे दुर्गसेवक मोहिमेत सहभागी होते. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ऐतिहासिक गडाकडे दुर्लक्ष आणि त्यातून दुरवस्था. पण शिवप्रेमी मावळ्यांनी अपार मेहनतीनं अशक्य ते शक्य केले. जीवधन गडावरील पायरी मार्ग संवर्धन मोहीम पूर्णत्वास गेली.