मुक्तपीठ टीम
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात भाजपा आक्रमक झाल्यानंतर क्राइम ब्रँचमधून त्यांची बदली करण्यात आली. तसेच त्यांची एटीएसकडून चौकशीही सुरु झाली. त्यानंतर आज सचिन वाझे यांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स चर्चेत आले आहे. या स्टेट्सनुसार सचिन वाझे कमालीचे निराश झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याशी वरिष्ठ पोलीस अधिकारी बोलून समजूत काढण्याचा प्रयत्न करीत असले तरी सातत्यानं राजकीय गदारोळात नाव ओढले जात असल्यामुळे केवळ राजकारणापोटी आपल्याला टार्गेट केले जात आहे, अशी सचिन वाझेंची भावना झाल्याचे मत त्यांच्या परिचितांकडून व्यक्त केले जात आहे.
सचिन वाझेंच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे खळबळ
सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे मनसुख हिरेन यांचे मृत्यूचे प्रकरण, या वादाच्या विळख्यात अडकलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेंच्या एका व्हॉट्सअप स्टेटसमुळे सर्वत्र खळबळ पसरलीच आहे परंतु चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी ठेवलेल्या स्टेटसमध्ये “जगाला आता गुड बाय करण्याची वेळ आली आहे” असे लिहिले होते. त्यामुळे यामध्ये एक वेगळे वळण सापडण्याची शक्यता आहे.
वाझे यांनी असे म्हटले की, “एका किरकोळ प्रकरणात सीआयडी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली होती. त्यातून काहीच हाती लागले नाही. पण आता इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसतेय आणि त्यांना या प्रकरणातून त्यांचे सहकारी पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे त्यांचे म्हणणे आहे. ३ मार्च २००४ च्या प्रकरणात आणि या घडलेल्या प्रकरणात कोणतेही साम्य नाही. “२००४ च्या प्रकरणात माझ्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीचे १७ वर्षे होते परंतु आता मात्र, माझ्याकडे ती १७ वर्षेही नाहीत, ना नोकरी करण्याचा संयम, आता या जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आली आहे, असं मला वाटत आहे.” सचिन वाझे यांनी असे म्हटले आहे. त्यांची कालच पोलिसांच्या महत्वाच्या क्राइम ब्रांचमधून कमी महत्वाच्या नागरिक सुविधा केंद्रात बदली करण्यात आली आहे.
सचिन वाझेंविरोधात आघाडी
मनसुख हिरेन यांची गाडी वाझेंकडे कशी आली? असा सवाल करतानाच वाझे हे हिरेन यांची गाडी वापरत होते, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर सचिन वाझे यांनी गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा होत नाही,असे माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेंचा बचाव करताना भाजपाला विचारलेला सवाल सध्या चर्चेत आला आहे. खरोखरच भाजपासाठी आक्रस्तळेपणाने टीव्हीवर मांडणी करणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करताना सचिन वाझेंनी दाखवलेली सक्रियतेमुळे त्यांना टार्गेट केले जात आहे का? असे गृहमंत्र्यांनी विचारले होते.
गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांनी हिरेन प्रकरण विधानसभेत लावून धरत वाझे यांच्यावर आरोप केले होते. त्यावर वाझे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अर्णब गोस्वामी-देवेंद्र फडणवीस आणि सचिन वाझे
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात अन्वय नाईकांना आत्महत्येसाठी प्रवृ्त्त केल्याचा आरोप होता, तरीही ते प्रकरण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना दाबण्यात आले, असा आरोप केला. त्यामुळे तेव्हा ते का दाबण्यात आले, त्याची चौकशी करणार अशीही घोषणा केली आहे.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी त्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात भूमिका बजावली. तेव्हापासून ते भाजपाच्या टार्गेटवर होते, अशीही चर्चा आहे.
सचिन वाझेंची प्रतिक्रिया
माध्यमांनी सचिन वाझे यांना फडणवीसांच्या आरोपांबाबत विचारलं असता, “माझ्यावरच्या आरोपांबाबत मला अजून काहीही माहिती नाही. नेमके आरोप काय आहेत हे कळल्यानंतरच मी माझं मत मांडेन.”
तसेच,“मनसुख हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं किंवा नसणं यामध्ये काय गुन्हा आहे? गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा आहे का? यात नेमका आरोप काय?” असा सवाल वाझे यांनी उपस्थित केला आहे.यावेळी त्यांना विमला हिरेन यांनी जबाबात तुमचं नाव घेतलं आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, असं विचारण्यात आलं. त्यावर मी जबाब वाचला नाही. त्यांनी काही आरोप केला जबाब वाचतो आणि त्यानंतर उत्तर देतो, असं ते म्हणाले.
फडणवीसांचे गंभीर आरोप
मनसुख हिरेन याच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टोला लगावला. वाझे यांना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. “हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या दाव्यानुसार सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केला. या प्रकरणी वाझे यांना अटक करा,” अशी मागणी फडणवीस यांनी केली. यावेळी फडणवीस यांनी त्यांची तक्रारही वाचून दाखवली होती.
सचिन वाझेंची क्राईम ब्रँच मधून बदली
मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात संशयास्पद भूमिका असणारे एसीपी सचिन वाझे यांची मुंबई क्राईम ब्रँचमधून बदली करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली. त्यानुसार बदलीही झाली. मात्र विरोधक सचिन वाझे यांच्या निलंबनासाठी आग्रही असून निलंबणानंतर त्यांना अटक करण्यात यावी यासाठी मागणी करत आहेत.