मुक्तपीठ टीम
काश्मीरी पंडितांबद्दल भारतीय जनता पक्षाला काहीही देणेघेणे नसून त्यांच्याबद्दलचा कळवळा हा केवळ देखावा होता. राहुल भट या काश्मीरी पंडित तरुणाच्या हत्येसोबत लाखो काश्मीरी पंडितांच्या आशा, आकांक्षा आणि स्वप्नांची चिताही रचली गेली आहे. काश्मीरी पंडितांच्या आजच्या विदारक परिस्थितीला भाजपाच जबाबदार आहे. मोदी सरकारने गेली ८ वर्षे काश्मीरी पंडितांच्या दुखाग्नीवर राजकीय पोळ्या भाजल्या आणि सत्तेच्या बाजारात काश्मीरी पंडितांचे दुःख विकले हे स्पष्ट झाले आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.
काश्मीरी पंडितांच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी सरकारचा समाचार घेतना सचिन सावंत पुढे म्हणाले की, भाजपा समर्थित व्हि. पी. सिंह सरकारच्या काळात काश्मीरी पंडितांचे स्थलांतर झाले त्यावेळी भाजपाचेच के. जगमोहन हे राज्यपाल होते. याच काळात काश्मीरी पंडितांच्या हत्या झाल्या व पलायनास मजबूर केले गेले. तरीही काश्मीरी पंडितांचे दुःख व कलम ३७० चे भांडवल सातत्याने भाजपा करत राहिली. २०१९ ला ३७० कलम हटवताना काश्मीरमधील दहशतवाद संपेल व पंडितांची घरवापसी होईल असे आश्वासन दिले पण मोदी सरकारच्या काळात दहशतवाद संपलेला नाही तर पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे.
देशभर मुस्लिम द्वेष पसरविण्यासाठी भाजपाने काश्मीरी पंडितांवरील अत्याचाराचा, अनुपम खेरसारख्या पिट्टूचा व अंकीत मिडियाचा वापर केला. ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे प्रमोशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः केले. जनभावना भडकावण्यासाठी चित्रपटात अर्धसत्य व अंगावर शहारे आणणाऱ्या हिंसेचा वापर केला गेला. या चित्रपटातून निर्मात्यांनी २५० कोटींपेक्षा जास्त कमावले पण काश्मीरी पंडितांचे हात मात्र रितेच राहीले. आज काश्मीरमध्ये जे सुरु आहे ती कोणत्या चित्रपटाची कथा नसून वास्तविकता आहे हे चित्रपटाचे प्रमोशन करणाऱ्या पंतप्रधान मोदी व भाजपाने लक्षात घ्यावे.
डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वातील युपीए सरकारच्या दहा वर्षांत ३००० पेक्षा जास्त पंडितांना नोकऱ्या दिल्या. ५९११ घरे बांधली पण मोदी सरकारने काहीच केले नाही. उलट काश्मीरी मुसलमानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले व काश्मीरी पंडितांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. यातून स्थानिक पंडितांचे जीव धोक्यात घातले गेले. आज केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपाने नियुक्त केलेले राज्यपाल मनोज सिन्हा आहेत त्यामुळे राहुल भटच्या सरकारी कार्यालयात झालेल्या हत्येनंतर पंडित सुरक्षिततेवरुन मोदी सरकारला जाब विचारत आहेत. आठ वर्षांत काय केले? हा प्रश्न विचारत आहेत. यावर पोलिस अश्रूधूर व लाठ्यांचा वर्षाव करत आहेत. काश्मीरी पंडितांवर अतीव कणव व्यक्त करणारी भाजपा इतकी निष्ठुर होताना पाहणे अविश्वसनीय आहे. आधीच अत्याचार ग्रस्त पंडितांवर आताचे अत्याचार होतानाचे चित्र विदारक आहे असे सावंत म्हणाले.
काश्मीरी पंडितांचे डोळे आता उघडले आहेत आणि भाजपाकडून धर्मांधतेची अफूची गोळी खाल्लेल्यांचे डोळेही उघडतील अशी आशा सावंत यांनी व्यक्त केली.