मुक्तपीठ टीम
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने उच्चांक गाठला असताना नरेंद्र मोदी सरकार मात्र त्यातून जनतेला दिलासा देण्याचा कोणताच प्रयत्न करताना दिसत नाही. मोदींनी सत्तेच्या पिचवरून आवेशाने पुढे येत शेवटची लाथ जनतेच्या पेकटात टाकून पेट्रोलचे शतक आवेशपूर्ण व दणदणीतपणे पूर्ण केलेले आहे. जनतेची हार झालेली असून त्यांच्या निवडक उद्योगपती मित्रांची मात्र जीत झालेली आहे. पेट्रोलपंपावर पूर्वी मोदींचा हसरा चेहरा दिसायचा आता कोरोनामुळे त्यांनी तोंडावर पट्टी बांधलेली दिसत आहे. इंधन दरवाढ पाहता आता त्यांनी तोंडाबरोबरच डोळ्यावरही अधिकृतपणे पट्टी बांधलेला फोटो पेट्रोलपंपावर लावावा, अशी खोचक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
पेट्रोल पंपावर मोदींचा डोळ्यांवर पट्टी बांधलेला फोटो लावा – सचिन सावंत pic.twitter.com/mQWHgZP2TG
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 19, 2021
इंधन दरवाढीवर मोदी सरकारचा समाचार घेताना सावंत पुढे म्हणाले की, “पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅसचे भाव प्रचंड वाढलेले असून जनता त्यात होरपळून निघत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मात्र हात वर करत या जीवघेण्या महागाईकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मोदी सरकारच्या कृतीचे प्रतिक स्पष्टपणे दिसण्यासाठी त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेला फोटो पेट्रोल पंपावर लावावा”.
“पेट्रोल, डिझेलच्या एक्साइज ड्युटीमधून मोदी सरकारने जनतेची लूट करत तब्बल २० लाख कोटींपेक्षा जास्त नफा कमावलेला आहे. तर दुसरीकडे उद्योगपतींचे मात्र ८.५० लाख कोटी रुपयांचे कर्ज राईट ऑफ केलेले आहे. विजय माल्या, निरव मोदी सारखे बँक लूटेरे परदेशी बसून मजा मारत आहेत आणि बँकांमध्ये घोटाळे वाढतच आहेत. त्याकडे मोदी सरकारचे लक्ष नाही मात्र जनतेची लूट राजरोसपणे सुरु आहे. जनतेचं कंबरडं मोडलं फार, पेट्रोल झालं सौ पार आणि गेले सहा वर्ष पाहतंय मोदी सरकार, अशी परिस्थिती झाली आहे”, असे सावंत म्हणाले.