मुक्तपीठ टीम
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या गुजरात दौऱ्यादरम्यान आपल्या भाषणात आपल्या जातीचा तसेच देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर भाष्य केलं. याच मुद्द्यावरून आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींच्या नेहरू यांच्या मुद्द्यावरून सध्या काश्मिरी पंडितांची अवस्था काय आहे याची आठवण करुन दिली आहे.
जातीचा प्रश्न येतोच कोठे?
- पंतप्रधान मोदी हे जगातील एक महान नेते आहेत, याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही.
- मात्र त्यांना जगातील घडामोडींविषयी जितकी इत्यंभूत माहिती आहे, तेवढी आपल्या देशातील घडामोडींविषयी आहे काय, असा प्रश्न अनेकदा पडतो.
- भारतीय जनता पक्षाने मोदी यांना निवडणुका जिंकून देणारा यंत्रमानव बनवले आहे.
- पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर आहेत.
- तेथील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या दौऱ्याचे आयोजन व नियोजन भाजपाने केले आहे.
- मोदी यांनी एका सभेत सांगितले की, “माझी जात वगैरे न पाहता गुजरातच्या जनतेने मला समर्थन दिले.”
- ऐन निवडणुकीत मोदी यांना आपल्या जातीची आठवण का व्हावी? गुजरातला शहरी नक्षलवादाचा धोका वाढत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
- मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याचा विसर त्यांना गुजरातला गेल्यावर अनेकदा पडतो.
- मोदींचे पहिले विधान स्वतःच्या जातीविषयी आहे.
- पंतप्रधानांच्या मनात स्वतःची जात असावी हे बरे नाही.
- जात विसरायला हवी.
- जात नाही ती जात या सावटातून बाहेर पडले पाहिजे.
- मोदी यांना देशभरातून मतदान झाले.
- अनेक मोठ्या राज्यांनी मोदी यांना भरघोस मतदान केले.
- तेथे जातीचा प्रश्न येतोच कोठे? त्यामुळे गुजरातच्या भूमीवर अशा प्रकारे जातपंचायत लावण्याची गरज नव्हती.
पंतप्रधानांपासून गुजरातबाबतचे सत्य लपवले जात आहे?
- गुजरातमध्ये शहरी नक्षलवाद वाढतो आहे, त्यापासून धोका आहे.
- ही चिंतेची बाब आहे, पण हा धोका संपूर्ण देशातच निर्माण झाला आहे.
- भीमा-कोरेगाव प्रकरणात शहरी नक्षलवादाचे कारस्थान समोर आले व त्यानंतर मोठया प्रमाणात धरपकड झाल्याचे दिसले.
- हा नवा दहशतवाद देशभरातच फोफावतो आहे.
- त्यात मुसलमानांचा सहभाग नसल्याने ‘भाजप’ त्यावर बोंब मारू इच्छित नाही, पण शहरी नक्षलवादाने अनेक राज्ये पोखरली आहेत.
- त्यातले एक गुजरात आहे.
- मुळात गुजरातला सगळ्यात जास्त धोका अमली पदार्थांच्या तस्करीपासून आहे.
- गेल्या काही महिन्यांत हजारो कोटी रुपयांचे ‘ड्रग्ज’ गुजरातच्या विमानतळांवर आणि बंदरांवर सापडले.
- ही चिंतेची बाब आहे.
- हे सर्व रॅकेट सुरळीत सुरू आहे.
- दहा हजार कोटींचा अवैध दारूचा व्यापार गुजरातेत सुरू असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
- हा आरोप नसून सत्यच आहे.
- याबाबतची सत्य माहिती पंतप्रधानांपर्यंत पोहोचविण्यात गुप्तचर खाते कमी पडले, की पंतप्रधानांपासून गुजरातबाबतचे सत्य लपवले जात आहे?
ऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे का वाजवायचे?
- पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादेत आणखी एक जळजळीत विधान केले ते कश्मीरविषयी.
- आपले पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील अनेक वेगवेगळी संस्थाने विविध राज्यांमध्ये विलीन केली.
- देश एकसंध केला, पण तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना केवळ कश्मीरचा एक प्रश्न सोडवता आला नाही.
- कश्मीरचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आज आपण सरदारांनी दाखवलेल्या मार्गानेच जात आहोत.
- ‘ मोदी यांनी हे अत्यंत परखड व जळजळीत भाष्य केले.
- मोदी कश्मीर व नेहरूंबाबत हे भाषण करत असताना तिकडे कश्मीरात काय सुरू होते?
- १० ऑक्टोबरला सकाळपासूनच कश्मिरी पंडित आपल्या सुरक्षेसाठी श्रीनगर व इतरत्र रस्त्यांवर उतरले होते.
- कश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी पंडित रस्त्यांवर उतरून केंद्र सरकारविरोधात आक्रोश करीत होते.
- आंदोलन करीत होते.
- आमचे संरक्षण करा.
- आम्हाला सुरक्षित स्थळी हलवा, अशा किंकाळया फोडत होते.
- हे चित्र धक्कादायक तितकेच मन विषण्ण करणारे आहे.
- नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारने त्याच प्रश्रावर मते मागितली.
- सत्ता मिळविली, मग गेल्या आठ वर्षात नेहरूंची कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत? ऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे का वाजवायचे? कश्मीरात गेल्या पाच महिन्यांपासून कश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग वाढले आहे.
- पंडित भयाच्या सावटाखाली वावरत आहेत.
- केंद्र सरकारने पंडितांना सुरक्षेची हमी दिली होती, पण पंडित मारले जात आहेत व पलायन करीत आहेत.
- यात नेहरूंचा काय दोष? मागच्या आठवड्यात गृहमंत्री श्री. अमित शहा कश्मीर दौऱ्यावर असताना राज्याच्या पोलीस महासंचालकांची हत्या झाली.
- हे आता रोजचेच झाले आहे.
- पंतप्रधान पॅकेज अंतर्गत अनंतनाग येथे पंडितांसाठी वसाहत उभी केली.
- तेथे तर आता स्मशानशांतता आहे.
- सुरक्षा कडे आहे, पण बाहेर पडल्यावर पुन्हा घरी परतण्याची खात्री नाही.
- कश्मीरमध्ये पंडित व इतर हिंदू जीव मुठीत धरून जगत आहेत.
- पंतप्रधानांपर्यंत ही सत्य माहिती पोहोचू नये याचे आश्चर्य वाटते.
मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार?
- रशिया-युक्रेन युद्धावर आपले पंतप्रधान बोलतात.
- ही युद्धाची वेळ नाही असे त्यांनी पुतीन यांना मैत्रीच्या नात्याने बजावले.
- त्याचा चांगलाच आंतरराष्ट्रीय गवगवा झाला, पण कश्मीरात जे सुरू आहे त्याचे खापर नेहरूंवर फोडून पंतप्रधान मोदी मोकळे झाले.
- नेहरूंची चूक सुधारण्यासाठीच लोकांनी मोदी यांना पंतप्रधान केले.
- मोदी हे का विसरत आहेत? मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार? असा प्रश्न पडावा अशी त्यांची वक्तव्ये आहेत.
- पुन्हा त्यांना आता गुजरात निवडणुकीच्या चक्रव्यूहात पक्षाने अडकविले, म्हणजे कश्मिरी पंडितांच्या किंकाळ्या हवेतच विरणार. आता नेहरू काय करणार?