मुक्तपीठ टीम
तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावर शेतकरी आणि विरोधकांमागोमाग आता संघाच्याही नाराजीचा सामना मोदी सरकारला करावा लागत आहे. त्यातही मोदी सरकारमधील कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हडेलहप्पी कारभाराबद्दल असंतोष व्यक्त होऊ लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने जाहीरपणे तोमर यांना फटकारले आहे. मध्य प्रदेशातील भाजपचे माजी खासदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते रघुनंदन शर्मा यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्यावर हल्ला चढवत म्हटले की “सत्तेचा माज दिसत नसतो, जसा तुम्हाला आता चढलाय!”
माजी खासदार रघुनंदन शर्मा यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना एक पत्र लिहिले आहे. पत्रातील मजकूर पुढील प्रमाणे आहे:
“प्रिय नरेंद्रजी, तुम्ही भारत सरकारमध्ये सहकारी आणि भागीदार आहात. आजचे राष्ट्रवादी सरकार बनेपर्यंत हजारो राष्ट्रवादींनी त्यांचे जीवन आणि तारुण्य समर्पित केले आहे. गेल्या १०० वर्षांपासून तरुणाई त्याग, समर्पण आणि परिश्रम करून मातृभूमीची सेवा आणि राष्ट्रहित सर्वोपरि मानत त्या विचारांच्या प्रसारात मग्न आहे. आज तुम्हाला जी सत्ता आणि अधिकार मिळाले आहेत, ते तुमच्या मेहनतीचे फळ आहे, हा तुमचा भ्रम आहे. जेव्हा सत्तेचा माज चढतो तेव्हा तो नदी, डोंगर, वृक्षांसारखा दिसत नाही, तो अदृश्य असतो, जसा सत्तेचा माज आता तुम्हाला चढला आहे. मिळालेल्या दुर्मिळ जनमताला का गमावता आहात? कॉंग्रेसची सर्व सडकी किडकी धोरणं आपणच राबवायची, हे विचारसरणीच्या हिताचे नाही. थेंबा-थेंबाने भांडे रिकामे होते, जनमतासोबतही असेच होईल.
तुमची विचारसरणी कदाचित शेतकऱ्यांच्या हिताची असेल, पण जर कोणाला स्वत:चे भले होऊ द्यायचे नसेल तर त्या सक्तीच्या हिताचे औचित्य काय? कोणाला कपड्यांविनाच राहायचे असेल तर कपडे घालण्याची सक्ती कशासाठी? राष्ट्रवाद मजबूत करण्यासाठी तुम्ही घटनात्मक शक्ती वापरा. कदाचित आपल्याला नंतर पश्चात्ताप होऊ नये. मला वाटते, विचारसरणीचं भविष्य सुरक्षित ठेवण्याचे संकेत लक्षात आले असतील.”
– मुक्तपीठ सरळस्पष्ट विश्लेषण-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोठे नाव असणारे शर्मा हे मध्य प्रदेशातून खासदारही होते. त्यांनी लिहिलेले खुले पत्र ही संघाची अधिकृत भूमिका नाही, हे स्पष्ट आहे. भाजप आणि संघात समन्वयासाठी संघटन मंत्र्याचे वेगळे पद असते. मात्र, अनेकदा संघ आपल्या मताविषयी सत्ताधाऱ्यांना जागवण्यासाठी असे इशारे देतो, असे संघाचा अभ्यास असणारे सांगतात.
तोमर म्हणजे भाजपसाठी आफतच!
- कृषिमंत्री म्हणून तोमर हे अपयशीच ठरल्याचे अनेकांचे मत आहे.
- त्यांच्या अंहकारामुळेच शेतकरी नेते दुखावले गेले असे मानले जाते.
- त्यांनी ऑक्टोबरमध्ये शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलवले, ते स्वत: त्या बैठकीतून गायब राहिले.
- त्यांच्या वागण्याला अपमान समजून शेतकरी नेते पंजाबात परतले.
- तेथे त्यांनी मोर्चेबांधणी करून शेतकरी आंदोलन पुकारले.
- तेव्हाच जर तोमर यांनी शेतकरी नेत्यांशी सन्मानाने चर्चा करत त्यांची समजूत काढली असती तर आंदोलन एवढे चिघळले नसते.
- आता परिस्थिती चिघळल्यानंतरही त्यांनी राज्यसभेत केलेले विधान कामकाजातून हटवण्याची नामुष्की आली.
त्यामुळे ज्येष्ठ संघ स्वयंसेवकाचे हे पत्र तोमर यांच्या कारभारावरील नाराजी स्पष्ट मांडणारे आहे. तसेच एकप्रकारे मोदी सरकारलाही परिस्थितीची जाणीव करून देत उतू नका मातू नका असा सल्ला देणारे आहे. त्याचवेळी भाजपची सत्ता संघामुळे आली असल्याची जाणीव करून देतानाच भाजपच्या अशा धोरणांशी संघाचा संबंध नसल्याची भूमिकाही मांडत स्वत:ला वादापासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्नही दिसत आहे. उलट काँग्रेसच्या सडक्या-किडक्या धोरणांना भाजप राबवत असल्याचे मांडत ती जबाबदारी काँग्रेचीच असल्याचे दाखवण्याचा प्रयत्नही या पत्रातून दिसून येत आहे.
– तुळशीदास भोईटे 9833794961
ह्या कायद्यामध्ये शेतकरी विरोधी काय बरे केले आहे हे सांगायला कोणी तयार नसेल तर चर्चेतून काही निष्पन्न होईल असे दिसत नाही पॅन नंबर लिहिण्याने कायद्याच्या चौकटीत राहणाऱ्यास काहीही धोका नाही. अर्थात इतकी वर्षे कायदे तोडणाऱ्यास अवघड जाणार हे स्पष्ट आहे
कृपया या विषयावर दुसरी बाजू मांडणारे लिखाण करा. मुक्तपीठ हे आपल्या सर्वांचं मुक्त माध्यम आहे