मुक्तपीठ टीम
कम्युनिटी डिझाईन एजन्सी, स्नेहालय आणि अहमदनगर महापालिका यांच्या पुढाकारातून अहमदनगर येथील झोपडपट्टीवासीयांना प्रधानमंत्री आवास योजनेत पक्की घरे आज सुपूर्द करण्यात आली. शहरातील संजयनगर भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा नुकताच आपल्या नवीन घरात ‘गृहप्रवेश’ झाला. येथील ३३ कुटुंबीयांची आपल्या हक्काच्या पक्क्या घराची ‘स्वप्नपूर्ती’ झाली आहे. सुरक्षित, आरोग्यदायी आणि आकर्षक अशा नवीन घरात प्रवेश करण्याची संधी या कुटुंबाना आज मिळाली. विशेष म्हणजे त्यांची घरं ही आदर्श म्हणावी अशी सर्व सुविधायुक्त रो-हाऊससारखी दिसणारी आहेत.
संजयनगर येथील रहिवासी, अहमदनगर महानगरपालिका, स्नेहालय संस्था आणि करी स्टोन फाउंडेशनचा उपक्रम असलेल्या कम्युनिटी डिझाईन एजन्सी (सीडीए) यांच्या एकत्रित प्रयत्नातून प्रधानमंत्री आवास योजनेतून (पीएमएवाय) उभारण्यात आलेल्या ३३ घरांच्या गृहप्रकल्पामुळे ही ‘स्वप्नपूर्ती’ झाली आहे. उर्वरित २६५ घरांचे बांधकाम नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरु होणार आहे. महापालिकेच्या दोन एकर जागेत वसलेली आणि एकमेकांशी अतिशय घट्ट वीण असलेली संजयनगर ही २९८ कुटुंबाची झोपडपट्टी वस्ती आहे. २०१८ मध्ये हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रायोगिक स्वरूपात सुरु झाला होता. चार वर्षांच्या प्रयत्नातून, नियोजनातून, काटेकोर संरचनेत उभारलेला हा संजयनगर पुनर्विकास प्रकल्प चांगले राहणीमान उपलब्ध करून देणारा आदर्श नमुना ठरला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेला करी स्टोन फाउंडेशनचे अर्थसहाय्य आणि रहिवाशांचे योगदान यामुळे हा प्रकल्प दिमाखदारपणे उभा राहिला. येथील सामाजिक मागासलेल्या कुटुंबाना चांगली, आरोग्यदायी घरे, नोकऱ्या आणि प्रशिक्षण, समाजाचे जीवनमान उंचावणारे उपक्रम, महिलांना घरांचा मालकी हक्क आदींमधून सक्षमीकरण करणे, हे या सर्व संस्थांचे एकमेव ध्येय आहे.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार २०५० पर्यंत जागतिक लोकसंख्येतील ४४ टक्के लोक संजयनगरसारख्या वस्त्यांमध्ये रहात असतील. केवळ भारतात अश्या २० दशलक्ष शहरी घरांची गरज आहे. जवळपास १४ दशलक्ष लोक आजही झोपडपट्टीत राहत आहेत. संजयनगरसारख्या अनेक भागातील मुलांची वाढ आणि आरोग्य सरासरीपेक्षा खूपच खालच्या दर्जाचे आहे. त्यामुळेच अल्प उत्पन्न गटातील लोकांना चांगली घरे देण्यावर भर दिला जात आहे.
समाजातील विविध विषमतांवर काम करण्याचा ‘सीडीए’चा मानस आहे. त्यातूनच समाजाचे प्रश्न सुटू शकतील, असा विश्वास त्यांना वाटतो. केवळ व्यक्तिगत घरांची उभारणी करून गृहनिर्माणातील असमानता दूर होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला एकत्रित समुदायांची निर्मिती करावी लागेल, असे कम्युनिटी डिझाईन एजन्सीच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या नायडू जनार्धन यांनी नमूद केले. आमचा अनुभव असा आहे की, हे लोक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने कमकुवत असले, तरी यांच्यातील मानवता आणि एकमेकांसोबत जगण्याची वृत्ती प्रेरणादायी आणि सक्षम आहे. दैनंदिन जगण्यात एकत्रित राहण्यात मिळणारा आनंद त्यांच्याकडून घ्यायला हवा. पहिल्या दिवसापासूनच संजयनगर येथील प्रत्येक कुटुंब या प्रक्रियेचा भाग बनले आहे. त्यामुळे यांच्यातील सामाजिक बंध अधिकच दृढ झाले . एकमेकांना मदत सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी उपयुक्त ठरली आहे.
पाणी, रस्ते, पथ दिवे, सांडपाणी व्यवस्था, बालके व समुदायांसाठी विरंगुळा केंद्र, आरोग्य संवर्धन, मनोरंजनासाठी जागा, पोषक वातावरण आणि उद्यान, दुकाने अशा विविध सोयीसुविधांची रचना या प्रकल्प उभारणीत केली आहे. रहिवाशांनी ही रचना तयार करताना योगदान दिले आहे. सामाजिक प्रश्न, शेजाऱ्यांशी जुळवणी आदी गोष्टी देखील लक्षात घेतल्या आहेत.
संजयनगरचा हा आव्हानात्मक प्रकल्प उभारताना मोलाचे सहकार्य मिळाले ते स्नेहालय या संस्थेचे. महिला आणि बालकांचे अधिकार, आरोग्य, शिक्षण यावर तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या स्नेहालय संस्थेची महत्वाची मदत या कार्यात झाली. ही नवी घरे उभारताना आणि सामाजिक भावनेतून रचना करताना स्नेहालयच्या कार्याचा अनुभव अतिशय उपयुक्त ठरला.
“या २९८ कुटुंबाना एकत्रित आणण्यासाठी, या प्रकल्पावर एकमत होण्यासाठी आमच्या कार्यप्रणालीतील दृढ इच्छाशक्ती, संयम आणि अष्टपैलुत्व विचारांची गरज होती,” असे स्नेहालयचे सहायक संचालक हनीफ शेख यांनी सांगितले. एकदा का येथील कुटुंबाना पुरेसा प्रकाश, खेळती हवा, शुद्ध पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा मिळाल्या की त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.