मुक्तपीठ टीम
रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. इस्रोचे माजी शास्त्रज्ञ, पद्मभूषण नंबी नारायणन यांच्या जीवनातील संघर्षगाथा म्हणजे ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ तो चित्रपटगृहांमध्ये येण्यापूर्वीच जगभरातील महोत्सवांमध्ये प्रशंसा मिळवतोय.
‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ हा आगामी चित्रपट, शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या वास्तवदर्शी जीवनावर आधारलेला चरित्रपट आहे. हा चित्रपट १ जुलै २०२२ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नंबी नारायणन हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी शास्त्रज्ञ आणि एरोस्पेस अभियंता होते, त्यांच्यावर १९९४ मध्ये हेरगिरीचा आरोप लावण्यात आला होता. पुढे ते त्यातून मुक्त झाले.
७५ व्या कान्स चित्रपट महोत्सवादरम्यान ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. कान्स चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले.
भारताने तंत्रज्ञानाच्या जोरावर अंतराळ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्राप्त केलेल्या सामर्थ्याला हा चित्रपट सलाम करतो, असे आर माधवन या प्रसंगी म्हणाले. हा चित्रपट म्हणजे ज्यांचे इंजिन कधीही निकामी झाले नाही अशा मास्टर नंबी नारायणन यांना आदरांजली आहे.
हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ खिळवून ठेवत नाही तर त्यांच्या हृदयाला स्पर्श करतो, हा चित्रपट म्हणजे नंबी नारायणन यांच्यासह हजारो शास्त्रज्ञांना आदरांजली आहे, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी यावेळी सांगितले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवी दिल्लीतल्या सिरी फोर्ट सभागृहात, लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते. या कार्यक्रमाला लेखक, निर्माता, दिग्दर्शक आर. माधवन यांच्या नेतृत्वाखालील रॉकेट्री टीम उपस्थित होती. या चित्रपटात आर. माधवन, मुख्य भूमिकेत आहेत तसेच त्यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या विशेष स्क्रिनिंगला सीबीआयचे माजी संचालक डी.आर. कार्तिकेयन, सीबीआयचे माजी पोलिस महानिरीक्षक पी.एम. नायर, केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि चित्रपट उद्योगातील हितसंबंधी उपस्थित होते.