मुक्तपीठ टीम
एनआयएने रविवारी मुंबई पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षक रियाझ काझी यांना अटक केली आहे. एनआयएच्या दाव्यानुसार रियाझने सचिन वाझे यांना अँटिलिया प्रकरणातील कटात मदत केली होती. एनआयए न्यायालयाने नुकतीच सचिन वाझेला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर लगेचच काही तासातच रियाझ काझीला अटक करण्यात आली आहे. उद्योगपती अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. सुत्रांच्या माहितीनुसार रियाझ काझी माफीचा साक्षीदार होण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे यांच्याप्रमाणेच रियाज काझी हे सहायक पोलीस निरीक्षक आहेत. अँटिलिया प्रकरणाव्यतिरिक्त सचिन वाझे यांचीही मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू आहे. १३ मार्च रोजी मनसुखचा मृतदेह सापडला. २५ फेब्रुवारीला अंबानींच्या घराजवळ सापडलेली स्कॉर्पियो मनसुखची होती. यानंतर सचिन वाझे यांना १३ मार्च रोजी अटक करण्यात आली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा खेळ इथपर्यंत मर्यादित नव्हता. दहशतवादी संघटनेच्या नावाखाली आणखी एक मोठा कट रचण्याचा वाझेचा प्रयत्न होता, असाही एनआयएचा दावा आहे. आपला दुसरा कट प्रत्यक्षात आणण्यापूर्वी ते स्वत:च्या विणलेल्या जाळ्यात अडकले आणि आता एनआयएच्या कैदेत आहे.