मुक्तपीठ टीम
जिथं ग्लॅमर तिथं गॉसिप ठरलेलंच. आता आम्ही तुम्हाला ती सांगणार आहोत ती अशीच एक गॉसिप स्टोरी. मात्र, ती अगदीच अफवा म्हणून फेकावी अशी फालतू नाही. ती आहे, चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) टीममधील क्रिकेटपटू ऋतुराज आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या मैत्रीची गोष्ट. ही गोष्ट इंस्टा चॅटमधून उलगडत असलेली इंस्टा स्टोरी आहे.
सायलीने काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. ऋतुराजने तिच्या पोस्टवर “वाह” असा रिप्लाय दिला. सायलीने काही हृदयाच्या इमोजीने प्रतिक्रिया दिली. आणि मग काय भाऊ….सुरु झालं ना गॉसिप रंगणं. दोघांमधील इंस्टाग्राम चॅट पाहिल्यानंतर चाहत्यांनी अंदाजाचे पंतग उडवण्यास सुरुवात केली. या दोघांच्या नात्यातील अफवांनी सोशल मीडियावर पिंगा घालण्यास सुरुवात झाली.
ऋतुराजने यावरही कमेंट केली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत म्हटले आहे की, फक्त गोलंदाजच त्याची विकेट घेऊ शकतात आणि इतर कोणीही घेऊ शकत नाही. त्याची पोस्ट मराठीत होती- “फक्त गोलंदाजच माझी विकेट घेऊ शकतात, ते ही क्लीन बोल्ड. आणखी कोणीही नाही. आणि ज्या कोणालाही समजून घ्यायचे होते, त्यांना ते समजले.” ऋतुराज फारच कमी काळात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या टीमचा महत्वाचा खेळाडू झाला आहे. आयपीएल २०२१ मध्ये ऋतुराजने आपला जबरदस्त फॉर्मने सीएसकेला शीर्षस्थानी ठेवला.
आयपीएल २०२१ च्या सात सामन्यात त्याने दोन अर्धशतकांसह २८ च्या सरासरीने १९६ धावा केल्या. या वर्षाच्या अखेरीस स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यावर ऋतुराज हे ड्यू प्लेसिससह सीएसकेचा सलामीवीर म्हणून राहील. सीएसकेने त्यांच्या सात सामन्यामध्ये पाच सामने जिंकले आणि स्पर्धेच्या अनिश्चित काळासाठी स्थगित होण्यापूर्वी पॉईंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळविले.