उदय नरे
कोरोनाच्या थैमानाने सारे विश्व व्यापले गेले. सर्व समाज व्यवस्था अर्थव्यवस्था कोलमडून गेली शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद कसे असणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पुनश्च हरिओम अंतर्गत सर्व व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. वाहतूक व्यवस्था उद्योगधंदे कारखाने हळूहळू सुरळीत होत गेले परंतु राज्यातील शाळा मात्र सध्या पूर्णपणे सुरू झाल्या नाहीत. शाळा म्हणजे… जिथे चिमुकली पावले बालमन आपल्या सवंगड्यांसह मजा करतात आणि शिक्षण घेत असतात. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती पाहता आर्थिक, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या पूर्णपणे भिन्न आहे. यामुळेच येथील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पातळीही भिन्न आहे. कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण मात्र चालू आहे. परंतु राज्यातील परिस्थिती पाहता आणि आलेल्या विविध सर्वेक्षणानुसार केवळ पंचवीस ते तीस टक्के विद्यार्थी ऑनलाइन शैक्षणिक सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यामुळेच अनेक विद्यार्थी इच्छा असूनही शिक्षण घेऊ शकले नाहीत. नवीन सर्वेक्षणानुसार ६९ टक्के पालकांच्या मनात नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू करावे अशी इच्छा आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण राज्य बोर्डाच्या नऊ विभागाद्वारे परीक्षा घेतल्या जातात या बोर्डाचा पेपर सर्वत्र एकच असतो परंतु दुर्दैवाने या नऊ बोर्डाचे विद्यार्थी मात्र आर्थिक व सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे भिन्न असतात. परंतु त्याचा पेपर मात्र एकच असतो राज्यातील कोरोनाची पार्श्वभूमी पाहता, शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा आता एप्रिल व मे महिन्यात होणार आहेत. दहावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे वर्ष दहावीनंतरच विद्यार्थ्यांना आपण कोणत्या मार्गाने जायचे आहे हे, ठरवायचे असते २०२० हे वर्ष कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावाने शैक्षणिक शुन्य वर्ष झाले असे म्हणायला हरकत नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या म्हणजे दहावी व बारावीच्या परीक्षा आता थोड्या उशिराने होणार आहेत. या परीक्षेच्या तणावाखाली शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी सर्वजण आहेत. सर्वसामान्यपणे विद्यार्थ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे या तीन महिन्यांमध्ये आमचा अभ्यास कसा होणार? परीक्षा पद्धती कशी असणार? तोंडी परीक्षेला किती गुण असणार? लेखी परीक्षेचे स्वरूप कसे असणार? मूल्यांकन कोणत्या पातळीवर होणार? आमचा निकाल कधी लागणार? असे अनेक प्रश्न आज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भेडसावत आहेत.
परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापन असते परंतु आपली परीक्षा पद्धती ही विद्यार्थी केंद्री नसून केवळ मार्कांसाठी धावणारी एक जीवघेणी स्पर्धा आहे, म्हणूनच विद्यार्थी आपल्या ज्ञानापेक्षा आपल्या गुणां पेक्षा, गुणवत्ते पेक्षा किती जास्त गुण मिळतात? यापलीकडे जात नाही कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे प्रत्यक्ष शिक्षकांशी शाळेत संवाद झाला नाही. परीक्षेचा सराव झाला नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास ढळला आहे. अशावेळी या विद्यार्थ्यांना समुपदेशनाची फार गरज आहे. परंतु अशा विद्यार्थ्यांना समुपदेशन देण्याऐवजी परीक्षेला सामोरे कसे जावे याचीच माहिती दिली जाते. याचाच फायदा खाजगी क्लासेस आणि नव्याने तयार झालेले बांडगुळसारखे ऑनलाइन मार्गदर्शक व्यवसाय विद्यार्थ्याला अक्षरश: लुबाडत आहेत. महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. पहिले आपल्या आरोग्याला जपा, कारण आरोग्य हेच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी दिली आहे.
शाळेतील शैक्षणिक वर्षात जर काही मागे राहिले तरी कोणतेही आभाळ कोसळणार नाही. आज विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर एकच लक्ष द्यावे. शाळेत शिकवलेला अभ्यासक्रम आपले असलेले पाठ्यपुस्तक महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून आलेल्या सूचनांचे पालन करून केवळ परीक्षेची तयारी करावी. यावर्षी होणारी परीक्षा ही केवळ तुमचीच नाही संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शालेय शिक्षण मंत्र्यांची आणि महाराष्ट्राच्या परीक्षा मंडळाची परीक्षा आहे. या परीक्षेला न घाबरता जसे आपण कोरोनाला सामोरे गेलो तसेच या परीक्षेला सामोरे जाऊन आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे.
परीक्षेचे वेळापत्रक राज्य मंडळांकडून लवकरच जाहीर होईल. समाज माध्यम किंवा इतर सोशल मीडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या वेळापत्रकाकडे अजिबात लक्ष देऊ नका. शिवाय शिक्षण विभागाने २५% आपला अभ्यासक्रम कमी केलेला आहे. शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्याला यासंदर्भात विश्वासात घेऊन पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी प्रयत्न करावेत. परीक्षा म्हणजे काही सर्वस्व नाही. परीक्षा आवश्यक असली तरी ती जीवनापेक्षा महत्त्व पूर्ण नाही. परीक्षेला सामोरे जात असताना जीवनातील अनुभव आणि सत्याला सामोरे जाण्याचा विश्वास आज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे. केवळ आपल्याच नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवनातील न विसरता येणारे हे कोरोनाचे वर्ष आहे. या वर्षी परीक्षा आहे. ती आपल्या सर्वांची. शिक्षण विभागाची तुमची, आमची सर्वांची.
नरे सर खूप योग्य व स्पष्ट विचार मांडले म्हणून मनापासून धन्यवाद . मी आपल्या विचारांशी सहमत आहे ,लोकमान्य टिळकांनी सुद्धा तब्बेत चांगली होण्यासाठी एक आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून तब्बेतीवर लक्ष केंद्रित केले होते .आज सर्वानाच … तसे करावे लागणार आहे .आपल्या सूचना 25 % विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतील की नाही यातही शंका आहे .