मुक्तपीठ टीम
देशात पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ तब्बल ६६ दिवसांच्या अंतराने झाली आहे. याआधी २७ फेब्रुवारीला इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली होती.
पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांच्या काळात इंधर दरवाढ अघोषित ब्रेकवर होती. निकाल रविवारी लागल्यानंतर ब्रेक संपला आणि लगेचच सरकारी कंपन्यांनी रोखून ठेवलेली इंधन दरवाढ जाहीर केली आहे.
तब्बल दोन महिन्यांनंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत दिल्लीमध्ये १५ पैसे आणि डिझेलच्या किंमतीत १८ पैसे लीटरमागे वाढ झाली आहे. याआधी २७ फेब्रुवारीला पेट्रोल २४ पैसे तर डिझेल १७ पैशानी महागले होते.
पाच राज्यातील निवडणुकांच्या काळात कच्चे तेल महागले तरीही पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ झाली नव्हती. पण जेव्हा जेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती चारवेळा कोसळल्या तेव्हा पेट्रोल, डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. यामुळे पेट्रोल ७७ पैशांनी स्वस्त झाले होते. आता पुन्हा एकदा नेहमीसारखेच इंधन दर वर-खाली होत राहतील, असा अंदाज आहे.