मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लष्कराचे सेवानिवृत्त डॉक्टर पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी देशभरातील नागरिकांसाठी मोफत ऑनलाइन वैद्यकीय सल्ला सेवा सुरू केली आहे. ही सेवा उत्तर प्रदेशसाठी ७ मे रोजी सुरू करण्यात आली आणि काही दिवसांनी राजस्थान आणि उत्तराखंडमध्येही याचा विस्तार करण्यात आला आहे. त्यानंतरच्या टप्प्यात इतर ठिकाणीही ही सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, सध्या ८५ वरिष्ठ डॉक्टर ऑनलाइन पोर्टलवर आपल्या सेवा देत आहेत आणि त्यांनी एक हजाराहून अधिक रुग्णांना ऑनलाइन सल्ला दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, तीन राज्यातून आलेल्या यशानंतर एक्स-डिफेन्स ओपीडीचे नाव डिफेन्स नॅशनल ओपीडी असे करण्यात आले आहे. १४ मेपासून संपूर्ण देशात त्याचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये सैन्य डॉक्टरांचा दीर्घ अनुभव जास्तीत जास्त वापरला जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लष्कराच्या, वायुसेनेच्या आणि नौदलाच्या सेवानिवृत्त डॉक्टरांना परत बोलावले आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले आहे. सैन्य वैद्यकीय कोअर स्थायी आयोग आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या सेवानिवृत्त डॉक्टरांवर पुन्हा करार केला जात आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी या डॉक्टरांची नेमणूक करण्यासाठी सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयाच्या (एएफएमएस) प्रस्तावाला मान्यता दिली होती.