मुक्तपीठ टीम
मोबिक्विकच्या दहा कोटी भारतीय युजर्सचा डेटा चोरल्याचा हॅकर्सनी दावा केला होता. याच पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व बँकने डिजिटल पेमेंट कंपनी मोबिक्विकला आपल्या १२ कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच कंपनीची कोणतीही चूक आढळून आल्यास कंपनीवर कारवाईचा इशाराही दिला आहे.
डेटा चोरीचा दावा मोबिक्विकने फेटाळला होता. तरीही मोबिक्विकला टीकेचा सामना करावा लागत आहे. डिजिटल तज्ज्ञांच्या मते हे डेटा लीक कंपनीच्या डेटाबेसशी संबंधित आहे.
मोबिक्विकने डेटा लीकसंबंधित दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेबद्दल रिझर्व बँक समाधानी नाही. त्यामुळे त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे. याबरोबर केंद्रीय बँकेनेही संबंधित कंपनीला बाह्य ऑडिटर्सना फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अशा प्रकरणात रिझर्व्ह बँकेला पेमेंट सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून किमान पाच लाख रुपयाचा दंड आकारण्याचा अधिकार आहे.