मुक्तपीठ टीम
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने तीन सहकारी बँकांवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने या बँकांना एकूण पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. दंड ठोठावलेल्या दोन बँका या महाराष्ट्रातील तर एक बँक पश्चिम बंगालमधील आहे. फलटण येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबईतील कोकण मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लि., आणि कोलकात्यातील समता को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँक लि. या बँकांचा समावेश आहे.
आरबीआयने या बँकांवर नॉन कम्प्लायन्समुळे कारवाई केली आहे. यशवंत सहकारी बँकेचे उत्पन्न, मालमत्तेचे वर्गीकरण व इतर बाबींच्या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल कारवाई करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यासोबतच नियमांचे पालन न केल्याबद्दल मुंबईस्थित कोकण मर्केंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला २ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याशिवाय कोलकाता येथील समता को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँक लिमिटेडला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या दंडाच्या कारवाईबाबत आरबीआयने सांगितले की, नियामक अनुपालनातील त्रुटींच्या आधारे हा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईचा बँकांच्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. या बँकांनी त्यांच्या संबंधित ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेशी त्याचा काहीही संबंध नाही म्हणजेच अशा कोणत्याही प्रक्रियेवर मध्यवर्ती बँकेच्या कारवाईचा परिणाम होणार नाही.