मुक्तपीठ टीम
जगाची दोन वर्षे कोंडी करणारी कोरोना महामारी आता भारतात पुन्हा काही प्रमाणात डोकं वर काढताना दिसत आहे. त्यामुळे काहीशी भीती निर्माण होत आहे. संशोधकांनी अभ्यासानंतर कोरोनाला रोखण्यासाठी मिक्स आणि मॅच लसीकरण हा प्रभावी तोडगा असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी कोरोनाविरुद्ध संरक्षण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग लसीकरणच असल्याचा दावा केला आहे. द लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले की, जर लोकांना मिक्स आणि मॅच लसीचा बूस्टर शॉट दिला गेला तर ते कोरोनापासून अधिक सुरक्षित राहू शकतात. मिक्स आणि मॅच लसीकरण म्हणजे तुम्हाला पहिल्या दोन डोसमध्ये मिळालेल्या लसीव्यतिरिक्त इतर लसीचा बूस्टर डोस देणे.
बूस्टर डोसमुळे अतिरिक्त संरक्षण मिळणार
- अभ्यासात, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, लसीच्या दोन डोसच्या तुलनेत तिसरा किंवा बूस्टर डोस दिल्यास, ते अतिरिक्त संरक्षण प्रदान करू शकते.
- त्याच वेळी, संशोधनात असे आढळून आले आहे की ते अधिक प्रभावी करण्यासाठी मिक्स आणि मॅच लसीकरण वापरणे प्रभावी ठरू शकते.
अभ्यासात काय आढळले?
चिलीच्या विद्यापीठांच्या सहकार्याने चिलीच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून, मिक्स आणि मॅच लस बूस्टर शॉटच्या परिणामकारकता समजते. या संशोधनासाठी, ११ ,१७४,२५७ लोकांचा समावेश करण्यात आला होता, त्यापैकी ४१ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाव्हॅक लसीचे दोन डोस मिळाले आहेत.
मिक्स आणि मॅच बूस्टर शॉट गंभीर प्रकरणांना प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त
- वेगवेगळ्या लसींच्या बूस्टर शॉट्सच्या परिणामकारकतेच्या या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले की ज्या लोकांना कोरोनाव्हॅकचा तिसरा डोस देण्यात आला होता, त्यांच्यामध्ये कोरोना लक्षणे रोखण्याची परिणामकारकता जवळपास ७९ टक्के आढळून आली.
- ज्यांना अॅस्ट्राझेनेका बूस्टर शॉट दिला आहे ते ९३ टक्के सुरक्षित असल्याचे आढळले, तर ज्यांना फायझर बूस्टर शॉट दिले ते ९७ टक्के सुरक्षित असल्याचे आढळले.
- या आधारावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बूस्टर शॉटमध्ये वेगळ्या कंपनीची लस दिल्यास लोकांच्या आजारावर परिणामकारकता वाढू शकते.
बूस्टर शॉटवर भर
बूस्टर शॉटसाठी मिक्स-अँड-मॅच लस प्रणाली वापरणे, कोरोनामुळे हॉस्पिटलायझेशन, व्हेंटिलेटर वापरणे आणि मृत्यूचे धोके लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. संशोधकांचे म्हणणे आहे की, अनेक अभ्यासांवरून असे दिसून येते की लसीच्या दोन डोसपासून बनवलेली रोगप्रतिकारक शक्ती काही काळानंतर कमी होऊ लागते, अशा परिस्थितीत ही पद्धत खूप उपयुक्त ठरू शकते.
पाहा व्हिडीओ: