मुक्तपीठ टीम
मूळच्या अमेरिकेच्या असलेल्या पण फुले-शाहू-आंबेडकर अभ्यासताना भारतात येऊन इथल्या मातीशी एकरुप होऊन. बुद्ध-फुले-आंबेडकर-मार्क्स यांच्या तत्वज्ञानाची अभ्यासपूर्वक मांडणी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या, डॉ गेल ऑम्व्हेट यांचे निधन झाले त्यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे..
मुख्यमंत्र्यांची डॉ. गेल ऑम्व्हेट यांना श्रद्धांजली
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्व्हेट तथा शलाका भारत पाटणकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.
“भारतातील सामाजिक चळवळी, लोकपरंपरा, संतसाहित्य अशा विविधांगी क्षेत्रात डॉ. ऑम्व्हेट यांनी संशोधक, अभ्यासक म्हणून तसेच स्त्रिया, वंचिताच्या न्याय हक्कांसाठी सक्रिय असे योगदान दिले आहे. समाजमनाशी एकरूप विदुषी म्हणून त्यांच्या या योगदानाची नोंद राहील. डॉ. गेल ऑम्व्हेट यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असे मुख्यमंत्री यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक, अभ्यासक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्व्हेट तथा शलाका भारत पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून भारतीय समाज, आदिवासी जीवनपद्धती, लोकजीवन, भारतीय मौखिक परंपरा, संत साहित्य यांचा गाढा अभ्यास असणाऱ्या जेष्ठ विचारवंत, समाजशास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्व्हेट या संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक होत्या. ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी त्यांनी विशेष कार्य केले. तथागत गौतम बुद्धांनी मांडलेल्या मानवतावादाच्या सिद्धांतासह, महात्मा ज्योतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान त्यांच्या सामर्थ्यासह त्यांनी आपल्या साहित्यातून नव्याने मांडले. क्रांतीवीर बाबूजी पाटणकर, क्रांतिवीरांगणा इंदुमती पाटणकर यांचा वैचारिक वारसा पुढे चालवत श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून त्यांनी डॉ. भारत पाटणकर यांना आयुष्यभर समर्थपणे साथ दिली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
गेल ऑम्व्हेट यांची पन्नास वर्षांची समाज सेवा!
- गेल ऑम्व्हेट साधारणतः ५० वर्षांपूर्वी भारतात आल्या.
- भारतात आल्यानंतर त्यांनी येथील सामाजिक, सांस्कृतिक चळवळींचा अभ्यास केला.
- संशोधन करीत असताना त्या कष्टकऱ्यांच्या चळवळींचा एक भाग बनून गेल्या.
- त्यांच्यासारखेच सर्वसामान्यांसाठी जीवन वाहिलेल्या भारत पाटणकरांच्या त्या जीवनसाथी.
- त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला. त्यासाठी त्यांनी सामाजिक क्षेत्रात संघर्ष करणा-या, लढणाऱ्या माणसांच्या चळवळींचा वैचारिक पाया भक्कम केला.
- त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी राहिल्या.
- फक्त ज्ञानच नव्हे तर त्यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य कष्टकरी माणसांच्या चळवळीसाठी समर्पित केले.
- जातिव्यवस्थेवर त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध माध्यमांतून आपले मत ठामपणे मांडले.
- भारतीय समाजक्रांती मार्क्सवाद, फुले आंबेडकरवाद आणि स्त्रीवादाच्या पायावरच शक्य आहे, असा विचार त्यांनी मांडला आहे.
- विचार आणि व्यवहारात फारकत होणार नाही, याची त्यांनी नेहमी जाणीव ठेवली.
यावेळी भुजबळ म्हणले की डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे कार्य पाहून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले महात्मा फुलेंच्या विचारांचा मोठा पगडा त्यांच्यावर होता. कष्टकरी जनतेच्या लढ्यात कायम अग्रभागी असणाऱ्या डॉ. गेलं ऑम्व्हेट यांनी दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजासाठी मोठे लिखाण केले. दुर्दैवाने ८१ व्या वर्षी कासेगाव येथे त्यांचे निधन झाले. मी माझ्यावतीने व अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.