मुक्तपीठ टीम
कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत आहे. ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नाही आहेत. अशात, कोरोना रुग्णवाढीत ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडंस्ट्रीजकडून राज्याला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरीमधून महाराष्ट्रसाठी १०० मेट्रिक टन मोफत ऑक्सिजन पुरवला जाणार आहे.
अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवते. तिने जामनगरहून महाराष्ट्रासाठी मोफत ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. महाराष्ट्र सरकारमधील शहर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत, महाराष्ट्र सरकारला रिलायन्सकडून १०० टन ऑक्सिजन गॅस उपलब्ध केला जाणार असल्याचे म्हटले आहे.
एमएमआर क्षेत्रातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबतच पेशंट्सना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजनची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. मागणी व पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी नक्की काय करता येईल, याचा आढावा घेण्यासाठी लिंडे कंपनीच्या ऑक्सिजन कंपनीला भेट देत pic.twitter.com/zzSHdyuqCf
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 13, 2021
भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून विषाणूने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी हॉस्पिटल बेड आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. लोकांच्या मृत्यूचा आकडा वाढला आहे. महाराष्ट्रात तर कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. राजधानी मुंबईत दिवसाला १० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. मुकेश अंबानी यांचे घर आणि रिलायन्सचे हेडक्वार्टर मुंबईमध्येच आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की, रिफायनरीत उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनमधील मोठा भाग मेडिकल वापरासाठी तयार करण्यात येत असून हॉस्पिटल्सना पाठवण्यात येत आहे.
रिलायन्सकडून पेट्रोलियम कोक गॅसिफिकेशनसाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो. त्यामुळे कंपनीकडे उपलब्ध साठ्यापैकी १०० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय वापरायोग्य करून तो महाराष्ट्राला विनाशुल्क पुरवला जाणार असल्याचे रिलायन्समधील एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे. भारत पेट्रोलियमच्या कोची रिफायनरीमध्ये देखील २० टन ऑक्सिजनचा साठा आहे. त्यातील काही ऑक्सिजन दक्षिणेत काही राज्याना पुरवला जात आहे.