मुक्तपीठ टीम
विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपाने या निवडणुकीत मविआ सरकारची मते फोडली आहे. या निकालानंतर भाजपा आणि मविआ नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरु झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस
आज मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रचंड मोठा विजय मिळाला आहे. मी स्वत: निवडून आलो तेव्हा झालेल्या आनंदापेक्षा मोठा आनंद झाला आहे. महाविकास आघाडीला ही चपराक आहे. अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनी निर्णायक विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी एकत्र आल्यावर सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो, हे मांडलेले गणित चुकीचं आहे, हे या निकालामुळं स्पष्ट झालं आहे. बावनकुळे यांचा विजय ही भविष्यातील यशाची नांदी आहे. नरेंद्र मोदी, जे पी नड्डा, नितीन गडकरी यांचं आभार मानतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा निर्णायक विजय असून भविष्यातील विजयाच्या मालिकेची सुरुवात आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चंद्रकांत पाटील
नागपूर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे खूप मोठ्या फरकानं विजयी झाले. भाजपची मत एकत्र ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो. महाविकास आघाडीची मत मिळवण्यात बावनकुळे यशस्वी झाले. अकोल्याचा विजय अद्वितीय आहे. वसंत खंडेलवाल यांनी तीन वेळचे आमदार गोपिकिशन बाजोरिया यांचा पराभव केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखवलेल्या श्रद्धा आणि सबुरीचं फळ आहे. नागपूरमध्ये काँग्रेसनं पोरखेळ केला. चिन्हावरचा उमेदवार छोटू भोयर यांना केवळ एक मत पडलं आहे. त्यांनी अपक्ष म्हणून पाठिंबा झालेला उमदेवार पराभूत झाला. राजीव सातव यांच्या निधनानं रिक्त झालेली जागा बिनविरोध केला. काँग्रेसनं धुळे मुंबईवर आमची बोळवण केली.
आपण करू ते तत्वज्ञान आणि दुसरे करतील तो घोडेबाजार, अशी काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे. विदाऊट मोदी या देशाचा विकास होणार नाही, हे लोकांना समजले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त पद्धतीने घ्या, मग तुम्हाला समजेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
नाना पटोले
भाजप ने घोडेबाजार करून हा विजय मिळविला आहे. घोडेबाजार होणे हे लोकशाही साठी घातक आहे. स्वतःचे मतदार त्यांनी बाहेर नेलं , त्यांचा आपल्या मतदारांवर विश्वास नव्हता. निकाल आला त्याचा स्वागतच करायला पाहिजे. बावनकुळे यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले त्यावर उत्तर नंतर आम्ही देऊ आता बोलणे योग्य वाटणार नाही. उमेदवार बदलणे ही आमची स्टेटजी होती त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अकोला बद्दल मला माहिती नाही.
प्रवीण दरेकर
चार जागांवर भाजप विजयी झालेली आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सत्तेत असले तरी जनता भाजपच्या सोबत आहे हे यावरून दिसते. नागपूरची जागा प्रचंड मतांनी जिंकली. अकोल्याची शिवसेनेची जागा भाजपने जिंकली. महाविकास आघाडीची क्षमता नाही. भाजपच्या मागे आज राज्यातील जनता आहे. तिन्ही पक्षातील अस्वस्थ लोक आहे ती देखील आहेत. नागपूरमध्ये मतं फुटली आहेत. आता शिवसेनेचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.