रवींद्र वर्पे / व्हा अभिव्यक्त!
पहिली लाट, दुसरी लाट आणि आता तिसरी लाट. कोरोनाच्या लाटांमागून लाटा येतात आणि प्रत्येक लाट ही आम्हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची वाट लावत आहे. पण द्राक्ष उत्पादक म्हटलं की जणू ते शेतकरी कोट्यधीशच, त्यांना कसलीच कमी नाही, असे मानणारा एक वर्ग शासन, प्रशासन आणि पत्रकारितेतही तयार झाला आहे. त्यामुळेच आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाट उसळताच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटात भीतीने गोळा आला आहे. कारण पहिली लाट फेब्रुवारी मार्च, दुसरी लाट त्याच सुमारास आणि आता तिसरी लाटही जानेवारीत. हाच नेमका द्राक्षाचा हंगाम आणि त्याचवेळी लॉकडाऊन झाले की फटका ठरलेलाच!
सत्तेत बसलेले विरोधात असताना शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतात. बांधावर येऊन नुकसानभरपाईची भाषा फेकतात आणि तेच सत्तेत जातात तेव्हा मात्र अटी, निकष आणि दिरंगाईत सारं विसरून जातात. आधी भाजपा सेना आणि आता सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या दोन्ही सत्ताकाळातील आम्हा शेतकऱ्यांचा शाश्वत अनुभव झाला आहे.
गेले २ वर्षे द्राक्ष हे पीक फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कोरोना लॉकडाऊनमध्ये येते आणि नुकसान होते आहे. त्याच्या आधीचे १ वर्ष अवकाळी पावसाने वाया घालवले. आताही कोरोनाची भीती. आता व्यापारी पूर्ण भाव पाडून खरेदी करत आहे. मीडियातील अनेक मूर्ख कोरोनाचा उदो उदो आणि सरकारचे चांगभलं करण्यात दंग आहे. कोरोनासाठी जनजागरण आवश्यकच पण आमचे मरण होईल असं लॉकडाऊन नसावं, असं का मीडियाला मांडावं वाटत नाही. किंवा एखादा वेगळा मार्ग काढावा असे का हे कोणीच का सुचवत नाहीत? नको ते राजकीय वाद दाखवण्यापेक्षा शेतकऱ्यांना कसं वाचवता येईल त्यावर का मीडिया कार्यक्रम, चर्चा घडवत नाही? किमान कोरोना खूपच पसरला, अनावर झाला आणि लॉकडाऊन लावायला लागलेच तर तेव्हा सरकार इतर उद्योगांना पॅकेज देते तसे आम्हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्यावे. आमचं नुकसानही नुकसानच आहे ना! त्यावर कोणीच का बोलत नाहीत. सतत तिसरं वर्ष नुकसानीचं झालं. आता हे चौथे तसं नको. त्यामुळे वेदनेनं, संतापानं राहवत नाही, म्हणून मांडतो आहे.
ज्यांना कोरोना होईल ते उपचार घेतील, काहींचे दुर्देवाने जीवही जातील. पण जर कोरोना लाट आणि लॉकडाऊनने वाट, असं सुरुच राहिलं तर आम्ही शेतकरी मात्र संपून जाऊ.
माझी भाषा जरी तिखट वाटत असेल, चुकत असेल तरी एक शेतकरी म्हणुन मला माझे मत मांडण्याचा अधिकार आहे. वरणावर तूप खाणाऱ्या लोकांसोबत मी ट्विटरवर ट्रॉलिंगमध्ये जिंकणार नाही हे मला माहीत आहे. पण महाराष्ट्रात रोज १४-२५ शेतकरी आत्महत्या करत आहे. कोणत्याही सरकार, मीडिया यांना काहीही पडले नाही. मग आज आम्हाला पण इतर लोकांचे काहीही पडले नाही. मरा नाहीतर जागा. पण लॉकडाऊन नको.
मीडिया आणि सरकारने सरकारी नोकर भरतीचे १२ वाजवले. मराठा आरक्षण तर नाहीच, पण प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुलांचे वसतिगृह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यातून मुलांना फायदा असे काहीही आजवर झाले नाही. मग शेवटी शेती करायला सुरुवात केली आणि गेले ३ वर्ष फक्त नुकसान, नुकसान आणि नुकसानच!
किती दिवस शेतकऱ्याने फक्त इतर लोकांचा विचार करायचा? आत्महत्या करायच्या त्यापेक्षा यांना शिव्या घाला आणि काम करा. आता अती झाले. सत्ताधारी, विरोधक, पत्रकार सर्वांनी आता थोडी संवेदनशीलता ज्यांच्याबाबतीत गैरसमज करून दुर्लक्ष केले जाते त्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडेही दिलेच पाहिजे. तुन्ही गैरसमज बाळगता ते तुम्हाला शहरात सुपरमार्केटमध्ये मिळणाऱ्या महागड्या द्राक्षांमुळे. कधी तरी मातीत या. आम्हाला विचारा आमचं जीवन कसं नासतं. ते महागडे विकणारे कमवून जातात. आमचा माल शेतातच सडतो, तरी ते परदेशात आणून कमावतात. पण आम्हाला न्याय नसतो. आता जागे व्हा. सरकारने लॉकडाऊन नाही तर कोरोनाला लॉक करावं. आमचं जीवन बरबाद होईल, असं काही करू नये!
(रवींद्र वर्पे हे शेतकरी पुत्र असून आयटी प्रोफेशनल आहेत.)
संपर्क – ट्विटर @ravindravarpe21