रविंद्र नारायण गुळकरी
अविनाश पाठक. हे गृहस्थच लई भारी… या सम नाही दुजा, या सम हाच. मी काय म्हणतोय ते समजून घ्या राजे हो. अविनाश सरांना वाचायचं म्हणजे सोपं काम नाही आणि खायचं काम तर नाहीच नाही. डायरेक्ट १३ पानी भरगच्च बायोडेटा असलेली ही अफलातून वल्ली. पक्की विदर्भवीर आणि टोटल एकल चलो रे….
मी चुकत नसेन तर वृत्तप्रकाशचित्रकार म्हणून यांनी हयात घालवली….लिखाणाचं अंग, मुशाफिरीची सवय, जनसंपर्काची चटक यामुळे चिकाटीनं अविनाश सरांनी स्वत:ला रुजवलं…. बहरवलं… आणि प्रस्थापित केलं… पत्रकाराच्या अंगी जात्याच जो एक एटीट्युड असतो, त्याचा पुरेपुर वापर करीत हे महाशय पत्रपरिषदा असोत, की मिट द प्रेस, समोरच्याचा कोणताही मुलाहिजा न ठेवता हक्कानं जबरी हैराण करतात…
बरेचदा अजेंडा घेऊन आलेले असतात…. अविनाश सरांना स्वतंत्र विदर्भाचा लई कैवार… त्यांनी लिहिलेले बहुतांश ‘लई भारी’ विदर्भाला आणि भाजपेतर राजकिय विचारधारेला वाहिलेले असतात….
‘समजुन घ्या राजे हो’ या स्तंभातून ते कधी मोदींना तर कधी नितीनजींनाही आपल्या अनुभवातून सल्ला लिहिताना दिसतात….
मला नेहमी वाटतं, खरं तर डायरेक्ट मुख्य संपादक होण्याची ठासुन क्षमता असलेल्या अविनाश सरांना संधीनं नेहमी हुलकावणी दिली, वर्ना यह चिज थी काम की… बरेचदा खाजगी चर्चेत अविनाशजी ही व्यथा बोलुनही दाखवतात…
उजव्या विचारसरणीच्या दैनिकाचं- साप्ताहिकाचं-सैटेलाईट चैनलचं-डिजिटल मिडियाचं सारस्थ्य करण्याचं त्यांच स्वप्न आजही आहे. दुर्दैवानं त्यांचं हे स्वप्न त्यांचे उजव्या विचारसरणीतल्या बैठकीतील त्यांचेच मित्र ध्वस्त करतात, याची मला राहुन राहुन खंत वाटते.
माझ्यासह अनेक नवोदितांकरिता सर कायम मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. त्यांचा अनुभव आणि संपर्क दांडगा. सामाजिक क्षेत्रातही सरांची वाटचाल मोठी. हा एकटा माणूस सगळ्यांना भारी पडतो. मराठी साहित्याशी निगडीत मोठी जबाबदारी सध्या अविनाश सर पार पाडताहेत.
आता साहित्य क्षेत्रात काही तरी भव्यदिव्य करायचा त्यांचा मनसुबा आहे. सरांचं सारं मनोवांछित पूर्ण व्हावं, हीच त्यांच्या वाढदिवशी श्रीदत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना.