मुक्तपीठ टीम
अकोट तालुक्यातील केळी व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी ८८०० रुपयांप्रमाणे विमा हप्ता भरूनही विमा कंपनीने २००, ३०० व ५०० या पटीत नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळले. या क्रूर थट्टेचे गाऱ्हाणे कास्तकारांनी मांडताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर २२ मार्च रोजी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरण्यात आले. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीवर कारवाईची मागणी रेटून धरण्यात आली. अखेर नरमलेल्या प्रशासनाने मग्रुरीने वागणाऱ्या विमा प्रतिनिधीची तातडीने हकालपट्टी केली.
विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसानभरपाईची रक्कम अदा करू, असे लेखी आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल तीन तास हा राडा चालला.
अकोट तालुक्यात केळी व फळबागांचे मोठे नुकसान होऊनही विमा कंपनीने दोनशे, पाचशे रुपये मदतीचे धनादेश हाती टेकवून शेतकऱ्यांची भलावण केली. ही बाब अकोट तालुक्यातील पणज व अकोली जहाँगीर महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांच्या कानावर घातली. यामुळे संतप्त झालेल्या तुपकर यांनी विमा कंपनीविरोधात थंड थोपटले. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ही मागणी घेऊन तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता केळीची झाडे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाण मांडल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. यावेळी उपाशी आलेल्या आंदोलकांनी कार्यालय आवारातच भाकरी खाल्या. न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा कठोर पवित्रा तुपकरांनी घेतल्याने याठिकाणी बंदोबस्तावर असलेले पोलिसही चक्रावून गेले. अखेर शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तातडीची बैठक बोलावली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांताप्पा खोत, उपविभागीय अधिकारी नीलेश अपार उपस्थित होते. विमा प्रतिनिधी दामोदर सपकाळ हे शेतकऱ्यांशी उर्मट वागत असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी तुपकर यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क केला, त्याचक्षणी विमा कंपनीने सपकाळ यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी कुंदर बारी यांची नेमणूक केली. तसेच शेतकऱ्यांना आठ दिवसांत पीकविम्याचा लाभ मिळवून देऊ, असे लेखी आश्वासन दिले. कमी दाखविलेले नुकसान गृहीत न धरता कृषि पंचनाम्यांच्या आधारावर रक्कम दिली जाईल, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी स्पष्ट केले.यावेळी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ अध्यक्ष दामूअण्णा इंगोले, राणा चंदन, विनायक सरणाईक,गणेश खुमकर,संजय सोनुने,सतीश देशमुख, विकास देशमुख उपस्थित होते..
२५ शेतकऱ्यांनी नाकारली मदत; धनादेश केले परत
हजारो रुपयांचे नुकसान होऊनही विमा कंपनीने २५ शेतकऱ्यांच्या हातावर शे, दोनशे रुपयांची मदत टेकवली. त्याचे दिलेले धनादेश शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परत करून आपला संताप व्यक्त केला. केळी उत्पादक पट्ट्यातील रुईखेड, पणज, अकोली जहाँगीर, महागाव, बोचरा, कारला, दिवठाणा, अकोलखेड, रुद्धडी, वडाळी देशमुख या शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि निर्ढावलेल्या प्रशासनाचा यावेळी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.
५ कोटींची मदत मिळणार
केळीच्या पट्ट्यामध्ये १८ फेब्रुवारी २०२१ रोजी गारपीट झाल्याने बागा नष्ट झाल्या. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळावा म्हणून रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकच आवाज उठविला. तुपकरांनी सिनठोकपणे शेतकऱ्यांची बाजू मांडल्याने जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी स्तब्ध झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी नमते घेत चारशे शेतकऱ्यांची यादी प्राप्त होताच जिल्हास्तरीय समितीचा निर्णय घेऊन या शेतकऱ्यांना लवकरच ५ कोटी रुपयांच्या विम्याचा लाभ देऊ, अशी ग्वाहीदेखील जिल्हाधिकारी पापळकर यांनी रविकांत तुपकर यांना दिली.