मुक्तपीठ टीम
नाटककार , दिग्दर्शक, नेपथ्यकार , वेशभूषाकार अशा विविध भूमिका रंगभूमीवर लीलया साकारणारे रत्नाकर मतकरी यांचा १७ मे हा प्रथम स्मृतिदिन! यानिमित्त ‘ लोककथा ‘७८ आणि त्याविषयी सर्वकाही’ या प्रतिभा मतकरी संपादित ग्रंथाचा डिजिटल प्रकाशन समारंभ पॉप्युलर प्रकाशन आणि सदामंगल पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १७ मे २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता पॉप्युलर प्रकाशन आणि महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुकपेजवर आयोजित केला असून याचवेळी सदामंगल पब्लिकेशन्सच्या ‘ संवाद रत्नाकर मतकरींशी’ या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे.
या कार्यक्रमात रामदास भटकळ, श्रीकांत बोजेवार, विजय केंकरे, हेमंत कर्णिक आणि सुप्रिया विनोद सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र टाइम्स आणि मिती क्रिएशन्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
प्रतिभा मतकरी संपादित ‘लोककथा ‘७८ आणि त्याविषयी सर्वकाही ‘
‘लोककथा’७८’ हे बेचाळीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले नाटक त्यातील भेदक सामाजिक आशय आणि रंगमंचीय सादरीकरणातील वेगळेपणा यांमुळे बरेच चर्चेत आले. या नाटकातील रौद्रभीषण वास्तव आणि त्याचा मन हादरवून टाकणारा प्रत्यय म्हणजे एक अविस्मरणीय अनुभव ठरला. नाटककार रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेल्या या नाटकातला भेदक सामाजिक आशय हा आजही तसाच आहे, किंबहुना अधिकच भीषण झालेला असल्यामुळे हे नाटक आजही तितकेच सुसंगत राहिले आहे. आणि म्हणूनच पॉप्युलर प्रकाशनाने या नाटकाच्या संहितेचा एक नवीन अवतार योजला आहे, आणि तो आहे प्रतिभा मतकरी यांनी संपादित केलेला ग्रंथ ‘लोककथा ‘७८ आणि त्याविषयी सर्वकाही ‘ !
गेल्या बेचाळीस वर्षांत स्वतः लेखक रत्नाकर मतकरी, मराठीतले अनेक मोठे समीक्षक, पत्रकार, ‘लोककथा ‘७८’ या नाटकात काम केलेले कलाकार अशा अनेकांनी या नाटकाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया वेळोवेळी व्यक्त केल्या. नाटकावरील मान्यवरांच्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या प्रतिक्रिया या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. त्याबरोबरच मूळ नाटकाची रत्नाकर मतकरींनी नव्याने वाढवलेली संहिताही यात समाविष्ट केली आहे. छापील स्वरूपात उपलब्ध झालेल्या विविध प्रकारच्या साहित्याचा सचित्र कोलाज या ग्रंथाच्या निमित्ताने नाट्यप्रेमी रसिक अनुभवतील . सतीश भावसार यांचे मुखपृष्ठ आणि मांडणी या ग्रंथाला लाभली आहे.
एक वेगळा आशय आणि आकार असलेल्या या नाटकाचा गौरव आणि त्याचबरोबर पुढच्या पिढ्यांना त्याचे महत्त्व पटवून देण्याच्या दृष्टीने त्याचे दस्तावेजीकरण होण्यासाठी या ग्रंथाचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशनाने केले आहे.
पॉप्युलर प्रकाशनाविषयी
पॉप्युलर प्रकाशन ही संस्था गेली शहाण्णव वर्षे इंग्रजी आणि मराठी भाषांतील प्रकाशनाच्या उत्तम दर्जासाठी ओळखली जाते. समाजशास्त्रज्ञ गोविंद सदाशिव घुर्ये, इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी आणि रोमिला थापर, तसंच राजकीय विचारवंत जयप्रकाश नारायण यांच्या पुस्तकांनी पॉप्युलरच्या इंग्रजी शैक्षणिक विषयींतील प्रकाशनाचा पाया रचला.
पॉप्युलर ही मराठी भाषेतीलही महत्त्वाची प्रकाशनसंस्था असून स्वातंत्र्योत्तर साहित्य चळवळींतले; विशेषत: नवकथा, नवकविता आणि मराठी रंगभूमीवरील नवीन प्रवाह पॉप्युलरने वाचकांसमोर मांडले. मराठी भाषेतील लेखकांना मिळालेले चारपैकी तीन ज्ञानपीठ पुरस्कार (कवी-नाटककार वि. वा. शिरवाडकर, कवी विंदा करंदीकर आणि कादंबरीकार-कवी भालचंद्र नेमाडे) पॉप्युलरच्याच लेखकांना मिळाले आहेत. त्यांशिवाय दिलीप पुरुषोत्तम चित्रे, ना. धों. महानोर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, ग्रेस, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, किरण नगरकर, श्याम मनोहर, दुर्गा भागवत, कमल देसाई अशा मराठीतील श्रेष्ठ साहित्यिकांशी पॉप्युलरचे नाव जोडले गेले आहे.