मुक्तपीठ टीम
कोकणातील मुंबई- गोवा महामार्ग तसेच गुहागर- विजापूर या महामार्गांचे रखडलेले बांधकाम तत्काळ पुर्ण करा अशी मागणी करणारी पोष्ट कार्ड केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने हाती घेतलेल्या पोष्ट कार्ड मोहीमेची सुरूवात आज चिपळूण येथे करण्यात आली.
मुंबई ते गोवा आणि गुहागर ते विजापूर या दोन्ही महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेली आठ- दहा वर्षापासून रखडले आहे. जुना रस्ता उखडून काढून नविन बांधकाम अर्धवट ठेवल्याने कोकणातील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याना प्रचंड खड्डे पडले आहेत. वास्तविक पावसाळ्यानंतर लगेच हे सर्व खड्डे भरणे आवश्यक होते. मात्र हे दोन्ही महामार्ग केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत त्यामूळे या महामार्गांच्या बांधकामावर कोणताही अंकुश राहिलेला नाही.
नितिन गडकरी यांनी मंत्री पदाची जबाबदारी घेतल्या नंतर या महामार्गाचे बांधकाम लवकर पूर्ण करण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र त्यांच्या मंत्रिपदाची सात वर्षे पुर्ण होऊनही या महामार्गाचे बांधकाम रखडलेले आहे. याचा तीव्र निषेध करीत ना. नितिन गडकरी यांना पोष्ट कार्ड पाठविण्याची मोहीम राष्ट्र सेवा दलाने हाती घेतली आहे. आज चिपळूण येथील प्रांत कार्यालय समोर सलग चौथ्या दिवशी पूरमुक्त चिपळूणच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणामध्ये सामील होत राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यानी महामार्ग दुरूस्तीसाठी जोरदार घोषणा देत निदर्शने केली.
यावेळी राजन इंदुलकर, अरुण मोहिते यांनी या आंदोलनामागील भुमिका स्पष्ट केली. राष्ट्र सेवा दलाच्या या मोहिमेला उपस्थित अनेक मान्यवरांनी पाठिंबा देऊन राष्ट्र सेवा दलाच्या मोहिमेचे कौतुक केले. अनेकांनी आपापल्या संघटना मार्फत पोस्ट कार्ड पाठविण्याची तयारी दर्शविली. आज या मोहिमेतील ५०० पोष्ट कार्ड रवाना करण्यात आली असून यापुढेही ही मोहिम अधिक वेग घेणार आहे.