मुक्तपीठ टीम
मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या समाधान अवताडे यांनी मिळवलेल्या विजयातून आघाडी सरकारविरोधातील असंतोष प्रकट झाला आहे , अशी प्रतिक्रिया केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केली आहे.
रावसाहेब पाटील दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, या विजयाबद्दल अवताडे यांचे अभिनंदन. अवताडे यांच्या विजयामुळे राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा काय असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. मुळात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतीला बहुमत मिळाले होते. असे असताना भाजपाशी दगाफटका करुन शिवसेनेने हे सरकार बनवलं ही दगाबाजी जनतेला मान्य नाही , हेच या निकालातून दिसले आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यातील विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. तीन पक्षाचे सरकार आहे मात्र तिन्ही पक्षांमधे समन्वय नाही. आपल्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे.
विविध कारणांमुळे शेतकरी, शेतमजूर अडचणीत आलेले आहेत.नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईही या सरकारने अद्याप दिलेली नाही. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालामुळे राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आणि नगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये या तिन्ही पक्षांचा सफाया होणार आहे , असेही रावसाहेब पाटील दानवे यांनी पत्रकात नमूद केले आहे.