मुक्तपीठ टीम
खरेतर कोरोना काळ संपेल आणि पुन्हा उभारी घेता येईल अशी जनतेस आशा होती म्हणूनच हे बजेट दिलासा देईल अशी आशा होती परंतु येत्या पंचवीस वर्षाचा आराखडा / ब्लू प्रिंट आणि अमृतकाळासाठीचा म्हणत सादर झालेला २०२२-२३ चा अर्थसंकल्प प्रत्यक्षात आम आदमी , गृहिणी , विद्यार्थी , असंघटीत कामगार , सूक्ष्म लघु उद्योजक या सर्वांचीच निराशा करणारा असल्याची टीका आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे.
कोरोना काळात ज्या शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था तगवून ठेवली त्या शेतकर्याचे उत्पन्न दुप्पट नाहीच पण त्याची हमीभाव मागणी सुद्धा पूर्ण न करणारा, ऐतिहासिक शेतकरी आंदोलनातील मागण्यांकडे दुर्लक्ष करणारा म्हणूनच मोदी सरकारसाठी शेतकरी उपेक्षित असल्याचे हा अर्थसंकल्प अधोरेखित करतो.
दोन कोटी वार्षिक रोजगार निर्मितीची स्वप्नपुर्ती अश्यक्य असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य करणारा, शिक्षणक्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये नवीन वर्गीय दरी निर्माण करणारा असल्याने ‘लोकांना ठेंगा’ दाखवणारा आणि महामारीचा फटका पचवलेली सामान्य जनता तथाकथित अमृतकाळातही उपेक्षितच ठेणारा अर्थसंकल्प असल्याची टीका आम आदमी पार्टीने केली आहे.