मुक्तपीठ टीम
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉस्पिटल सुरू करण्याचं मी योजलं तेव्हा सर्वात पहिला विरोध शिवसेनेने केला. चिपी विमानतळ आणलं तेव्हाही विरोध करणारी शिवसेनाच होती. मात्र मागाहून विमानतळ पूर्ण होतंय समजल्यावर स्वतः श्रेय घेणारी शिवसेनाच आहे. प्रत्येक विकास कामाला विरोध करायचा आणि आपल्या शिवाय काम पूर्ण होतंय समजल्यावर श्रेय घेण्यासाठी धडपड करायची हे शिवसेनेचं नेहमीचंच काम असून आयत्या बिळावर नागोबा म्हणजेच शिवसेना असल्याची टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलीय. पडवे येथील लाईफटाईम मेडिकल कॉलेजच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते.
पडवे येथील लाईफटाईम मेडीकल कॉलेजचे उद्घाटन भाजपचे दिग्गज नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी दुपारी झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात खा. राणे बोलत होते. मेडीकल कॉलेजचे उदघाटन खमक्या व्यक्तीच्या हातून करायचे होते. त्यासाठीच मी अमितजी शहा याना निमंत्रण दिले. त्यांनी तात्काळ सहमती दिल्याबद्दल राणेंनी त्यांचे आभार मानले. अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे ते म्हणाले. दर्जेदार शिक्षण देणे शिक्षकांचे काम तर शिक्षण आत्मसाद करणे विद्यार्थ्यांचे काम आहे, असे सांगून मी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करतो म्हटल्यावर शिवसेनेने सर्वप्रथम विरोध केला. आता जिल्ह्यात शासकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. पण प्रत्यक्षात तिजोरीत एक पैसाही नाही. मग वैद्यकीय महाविद्यालयाला ९०० कोटी कसे देणार ? असा सवाल करून विकास कामांना विरोध करायचा आणि उदघाटनाला आयत्या बिळावर नागोबा बनून येणे याला शिवसेना म्हणतात, असं नारायण राणे म्हणाले.