मुक्तपीठ टीम
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा वखार महामंडळाला देण्यात आली होती. कोरेगाव येथील विकसित न झालेली जागा महामंडळाकडून बाजार समितीस परत देण्यात यावी, अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्या.
आज विधानभवनात विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची जागेसंदर्भात आढावा बैठक झाली.
यावेळी सभापती निंबाळकर म्हणाले, वखार महामंडळाने काही जागेवर गोदामे उभारली आहेत. गोदामांची जागा सोडून उर्वरित जागा मोकळी आहे. वखार महामंडळाकडून उर्वरित जागेचा वापर होत नाही. त्यामुळे जी जागा मोकळी आहे ती जागा कृषी उत्पन्न बाजार समितीला परत देण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, कोरेगाव बाजार समितीची जागा वखार महामंडळाकडे आहे. त्या जागेची पाहणी करून ती जागा बाजार समितीला परत देण्यात येईल.
बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, पणन सहसंचालक विनायक कोकरे, पणन विभागाचे उपसचिव वळवी, वखार महामंडळाचे अधिकारी, कोरेगाव बाजार समितीचे सभापती काकासाहेब गायकवाड, संचालक संताजी जगताप, सचिव संताजी यादव उपस्थित होते.