मुक्तपीठ टीम
मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असल्यामुळे केंद्र सरकार ने संसदेत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायदा करावा लागेल. मात्र त्यासाठी केंद्राला फक्त मराठा समाजाचा विचार करावा लागणार नाही तर देशभरातील सर्व क्षत्रिय समाजाचा विचार करून क्षत्रिय समाजातील गरिबांना आरक्षणाचा कायदा करावा लागेल त्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रीय मराठा पार्टी चे अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर यांना दिले.
मुंबईत बांद्रा येथील संविधान निवासस्थानी राष्ट्रीय मराठा पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार ने कायदा करावा या मागणीचे निवेदन दिले.
मराठा समाजाच्या आरक्षणाला दलित पँथरच्या काळापासून आपण पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून ही माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लोकसभेत सर्वप्रथम मी मागणी केली होती. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण द्यावे ही मागणी आहे. सर्व पक्षीय बैठकीत पंतप्रधानांसमोर मी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विषय मांडला होता. राज्यसभेत ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्तीचे विधेयक संसदेत मंजूर करण्याची सूचना मांडली होती. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, असे आश्वासन रामदास आठवले यांनी अंकुशराव पाटील यांना दिले.