मुक्तपीठ टीम
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.महाराष्ट्राच्या गृह विभागावर कलंक लागला गेला आहे.त्यामुळे नैतिकेच्या दृष्टीने अनिल देशमुख यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेल्या गाडीच्या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एन आय ए ने अटक केली आहे.अशा गंभीर प्रकरणात पोलीसांची नावे येणे ; मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरण; तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि आता थेट माजी पोलीस आयुक्तांनी राज्याच्या गृहामंत्र्यांवरच वसुलीच्या टार्गेट चे केलेले गंभीर आरोप पाहता महाराष्ट्र राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या यंत्रणेवर जनतेचा विश्वास राहिला नाही.
त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचे पत्र उद्या सोमवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आपण देणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी आज दिली.
सचिन वाझे सारख्या पोलीस अधिकाऱ्याची शिवसेनेने अनेकदा बाजू घेतली आहे.शिवसेनेशी सचिन वाझे यांचे जवळचे संबंध राहिले आहेत. वाझे सारख्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव एन आय ए च्या चौकशीत दोषी म्हणून आले आहे.त्यांना वाचविण्यासाठी वाझे ला पाठीशी घालण्याचा प्रयत्न शिवसेने ने केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याच्या गंभीर प्रकरा मागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता आहे.या मागे कोण बडे लोक आहेत त्याचा उलगडा होण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.
गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाईमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे नाव येणे हा गंभीर प्रकार आहे.कायदा आणि सुव्यवस्थेवरून जनतेचा विश्वास उडविणारा प्रकार आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणे या मागे कुणाचे षडयंत्र आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. त्या घटने नंतर घडलेल्या घटनाक्रमात राज्याचा गृह विभाग कलंकित झाला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावर राहण्याचा अधिकार राहिला नाही. त्यांनी नैतिकेच्या दृष्टीने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे तसेच राज्यात ढासळलेल्या कायदा आणि सुव्यस्थेला राज्याचे प्रमुख म्हणुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा जबाबदार असल्याने राज्य सरकार बरखास्त करावे असे पत्र मी उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देणार असल्याचे रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केले.