मुक्तपीठ टीम
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १४ एप्रिल या जयंतीदिनी अभिवादन करावे, असे आवाहन केद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले बोलत होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले, जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात यावे. चैत्यभूमी स्मारक तसेच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी करू नये. प्रथा-परंपरेनुसार जयंती उत्सवाचे स्मारकांतून थेट प्रक्षेपण होणार असल्याने या माध्यमातूनच यावर्षी अभिवादन करावे. शहरांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करतांना पाचपेक्षा जास्त लोक जमणार नाही याची काळजी घेतली जावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यात विविध सामाजिक संस्था रक्तदान शिबीरे आयोजित करण्याचा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवित असतात. यावर्षीही संबंधितांची परवानगी घेवून आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही यांची दक्षता घेवून याचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश आठवले यांनी दिले.
बांद्रा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व परवानग्या मिळत आहेत. १४ एप्रिल रोजी येथे भूमीपुजन करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याने या कार्यक्रमासाठी परवानगीची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले म्हणाले, गेल्यावर्षी पूर्ण लॉकडाऊन होते. पण विषाणूने केवळ शिरकाव केला होता. आता मात्र निर्बंध कमी केले आहेत. पण विषाणूने आक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. दिवसागणिक रुग्णवाढ होऊ लागली आहे. जोपर्यंत आपण मनापासून शिस्त पाळत नाही, तोपर्यंत ही रुग्णवाढ कमी होणार नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन करावे लागत आहे. कमीत – कमी गर्दी आणि नियमांचे पालन करूनच जयंती साजरी करावी लागेल. साधारण परिस्थितीत आपण ज्या प्रथा-परंपरा पाळून जयंती साजरी करतो, त्या सर्व गोष्टी तितक्याच सन्मानपूर्व केल्या जातील. भीमसैनिक आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सन्मान करणारे आपण सर्व डॉ. आंबेडकर यांच्या शिस्तीचे भोक्ते आहोत, हे अशा कठीण परिस्थितीत दाखवून देणे अपेक्षित आणि आवश्यक आहे, असेही आठवले यांनी सांगितले.
यावेळी महसूल, पोलीस तसेच सामाजिक न्याय विभाग, सार्वजनिक बांधकाम महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तसेच अविनाश महातेकर, यशवंत जाधव, गौतम सोनवणे, कांबळे यांची उपस्थित होती.