मुक्तपीठ टीम
भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरातील शंभर एकर जमीन संपादित करून तेथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारावे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने ५० ते १०० कोटींचा निधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. राज्य सरकारने १०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्यातून विजयस्तंभ परिसरात भव्य स्मारक उभरण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
शनिवारी (ता. १) २०४ व्या शौर्य दिनानिमित्त रामदास आठवले यांनी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. यावेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, ऍड. आयुब शेख, संगीता आठवले, संघमित्रा गायकवाड, शशिकला वाघमारे, हिमाली कांबळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, सचिव महिपाल वाघमारे, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, निलेश आल्हाट, मोहन जगताप, श्याम सदाफुले, जयदेव रंधवे आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे ५०० महार शूर सैनिकांनी महापराक्रम गाजवत ४० हजार पेशवे सैन्याला पराभूत केले होते. त्या शौर्याचे प्रतिक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या विजयस्तंभाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी अभिवादन करण्यास येत. आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास भावी पिढीला प्रेरणा देत राहील म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशामुळे दरवर्षी आंबेडकरी जनता भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यास येते.”
“१९८० मध्ये आम्ही भारतीय दलित पँथरच्या माध्यमातून भीमा कोरेगाव येथे अभिवादन सभा घेण्यास सर्वप्रथम सुरुवात केली. त्याकाळी लोक कमी येत होते. मात्र अलीकडच्या काळात भीमा कोरेगाव येथे दरवर्षी लाखो लोक येऊ लागले आहेत, याचा अभिमान आहे. या शौर्याचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी याठिकाणी स्मारक होण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. लवकरात लवकर स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भीमशक्ती एकत्र होणे गरजेचे आहे.”