मुक्तपीठ टीम
जागतिक पर्यावरण दिन मुंबईतील अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज संस्थेत साजरा करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी संस्थेला भेट देऊन तेथील वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला.
संस्थेच्यावतीने दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या पालकांसाठी विशेषतः मूकबधिर व्यक्ती आणि त्यांच्या पालकांसाठी आभासी पद्धतीने आयोजित “आशेचे रोप -एक नवी सुरुवात “ या झाडांचे महत्व सांगणाऱ्या वेबिनार मध्ये आठवले सहभागी झाले.
यावेळी बोलताना आठवले यांनी सांगितले की, या कोरोना महामारीच्या काळात आपणा सर्वाना ऑक्सिजन चे महत्व पटले आहे आणि आपले पर्यावरण ठीक राहिले तर आपण ठीक राहु आणि ते नीट ठेवण्याची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. पर्यावरण रक्षणातील आपला वाटा म्हणुन प्रत्येकाने आपल्या आयुष्यात १०० झाडे लाऊन ती जगवली पाहिजेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी एकमेकांना सहाय्य करायला हवे, असे आठवले यावेळी म्हणाले.
संस्थेच्यावतीने आभासी पद्धतीने आयोजित “आशेचे रोप -एक नवी सुरुवात “ हा वेबिनार, परिसंस्थेच्या पुनर्निर्माणासाठी आवश्यक असलेल्या निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या जागतिक मोहिमेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे, यासाठी आहे असे संस्थेच्या संचालक डॉ. सुनी मरींयम मॅथ्युं यांनी सांगितले.
अली यावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण दोष संस्थेच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा गठ्ठू यांनी मुलांना विविध उदाहरणातून पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून देताना संयुक्त राष्ट्र संघटनेची शाश्वत विकास ध्येय्य ही संकल्पना स्पष्ट केली. यातील पंधरावे ध्येय हे पर्यावरण असून त्याचा अन्न, उर्जा आदि इतर ध्येयाशी असलेला संबंध त्यांनी समजावून सांगितला. परिसंस्थेच्या पुनर्निर्माणासाठी अनेक प्रकारे हातभार लावता येईल, जसे की, वृक्षारोपण, हरित शहरे, बागा, आपल्या आहारविहारात बदल, नद्या आणि समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, असे त्यांनी सांगितले.
डोंबिवली येथील संवाद कर्णबधीर प्रबोधिनीच्या संचालक छाया घाडगे यांनी मुलांना झाडांचे कंद, वेल आदि प्रकार, बियांपासून रोप तयार करणे आणि त्याची जोपासना कशी करावी याविषयी सोदाहरण माहिती दिली.
या राष्ट्रीय वेबिनार मध्ये संस्थेच्या विविध शाखांमधील दिव्यांग विद्यार्थी आपल्या पालकांसह सहभागी झाले होते. अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंग डिसएबिलिटीज (दिव्यांग) ही संस्था भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाच्या अंतर्गत, देशभरातल्या मूकबधिर दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी काम करणारी, सर्वोच्च राष्ट्रीय संस्थांपैकी एक संस्था आहे.