मुक्तपीठ टीम
कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पुरेसा लसपुरवठा होत नसल्यानं सुरु झालेला वाद आता जास्तच उफाळला आहे. जर महाराष्ट्राला लस पुरेशी लस मिळणार नसेल तर पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमधून देशातील इतर राज्यांना होणारा लस पुरवठा रोखावा लागेल, असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
कोरोनाची संसर्ग आणि मृत्यूची साखळी तोडण्यासाठी राज्यात वर्षाच्या सुरुवातीपासून लसीकरणाला वेग आला होता. जलद लसीकरणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक लसीकरण केंद्रं बंद करण्यात आली आहेत. त्यावरून आता राजकारण तापलं आहे.
राजू शेट्टींचा इशारा
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना लसीसाठी पत्र लिहिले आहे. जर येत्या एक आठवड्यात लसीच्या पुरवठ्यात वाढ झाली नाही तर सीरम इन्स्टिट्यूटमधून इतर राज्यात लस घेऊन जाणारे वाहने बाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
सात दिवसाच्या आत महाराष्ट्रातील नागरिकांना लस उपलब्ध झाली नाही तर सिरमच्या लसीचा एक थेंब देखील महाराष्ट्राबाहेर जाऊ देणार नाही. @CMOMaharashtra @PMOIndia @narendramodi @rajeshtope11 @ANI @AmitShah pic.twitter.com/GPiiYPnOT0
— Raju Shetti (@rajushetti) April 9, 2021