मुक्तपीठ टीम
सध्या राज्यात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये गुंडांप्रमाणे टोळीयुद्ध सुरु असून जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दोन्ही सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली थकीत ऊस बिलासंदर्भात काँग्रेस भवनसमोर सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान राजू शेट्टी यांनी आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारला लक्ष्य केले आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात राजकीय टोळीयुद्ध!
- दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत.
- यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलणे गरजेचं आहे.
- असं असताना ते भलत्याच कामात व्यस्त आहेत.
- बिघडलेल्या अभिनेत्यांची बिघडलेली पोरं गांजा ओढतात. यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
- पण इथे महापुरात बुडालेला शेतकरी, अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेला शेतकरी, ऊस बिल न मिळाल्याने आंदोलन करणारा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही हे दुर्दैवी आहे.
- इथे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे.
- गुंडांच्या टोळ्यांप्रमाणे एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली जाते.
सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करायला कमी पडतंय!
- ऐन दिवाळीच्या काळात रस्त्यावर उतरत शेतकरी बेवारशासारखा आंदोलन करत आहेत आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात, ही शरमेची बाब आहे.
- वास्तविक १४ दिवसात ऊस बिले अदा करणं बंधनकारक आहे.
- अन्यथा कारखानदारांवर कारवाई करणं गरजेचं आहे.
- सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करायला कमी पडत आहे.
शेतकऱ्यांना शिव्या घालणाऱ्या म्हेत्रेंवर टीका
- ऊस बिल मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे भडकले होते.
- रागाच्या भरात त्यांनी एका शेतकऱ्याला शिवी देखील हासडली होती.
- त्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
- त्यावरुन शेट्टी म्हणाले की,‘आपल्या घामाचा मोबदला मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना शिव्या दिल्या जातात.
- शिव्या घ्यायच्या झाल्या तर त्यांच्यापेक्षा जास्त घाण शिव्या आम्हाला येतात.
- मात्र ती आमची संस्कृती नाही.
- यावरून अक्कलकोटची संस्कृती कुठल्या थराला गेली आहे याचा अंदाज येईल.