मुक्तपीठ टीम
कर्तव्य पथ
पूर्वीचा राजपथ
पण फक्त नाव नाही बदललं, तर त्या मार्गाचा संपूर्ण कायाकल्प झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेला ‘कर्तव्य पथ’ सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. शक्तीचे प्रतीक असलेल्या पूर्वीच्या राज पथाकडून, सार्वजनिक मालकी आणि सक्षमीकरणाचे उदाहरण असलेल्या कर्तव्य पथाकडे मार्गक्रमण करणे हे यामधून सूचित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधानांनी इंडिया गेट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे देखील अनावरण केले. अमृत काळातील नव्या भारतासाठी: ‘वसाहतवादाच्या मानसिकतेच्या खुणा पुसून काढा’ या पंतप्रधानांच्या नव्या भारताच्या दुसऱ्या ‘पंच प्रण’ अर्थात निश्चयाशी ही पावले सुसंगत आहेत.
गेल्या अनेक वर्षांमध्ये राजपथ आणि सेन्ट्रल विस्टा अव्हेन्यू परिसराला भेट देणाऱ्यांच्या वाढत्या रहदारीमुळे इथल्या पायाभूत सुविधांवर ताण पडत होता. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, रस्त्याकडेच्या सोयुसुविधा आणि पार्किंगसाठी पुरेशी जागा या मूलभूत सुविधांची उणीव होती. तसेच या ठिकाणी अपुरी चिन्हे, कारंजी आणि इतर जलाशय यांची निकृष्ट दर्जाची देखरेख आणि अव्यवस्थित पार्किंग होते. त्याबरोबरच सार्वजनिक हालचालींवर कमीत कमी निर्बंध आणून कमी व्यत्ययासह प्रजासत्ताक दिनाची परेड आणि अन्य राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज भासू लागली. या गोष्टी लक्षात घेऊन पुनर्विकास करण्यात आला असून त्याच्या स्थापत्त्य वैशिष्ट्यांची एकात्मता आणि अखंडत्व सुनिश्चित करण्यात आले आहे.
कर्तव्य पथ हा सुशोभित लँडस्केप, पायवाटांसह हिरवळ, अतिरिक्त हिरवळीची जागा, नूतनीकरण केलेले कालवे, नवीन सुविधा ब्लॉक्स, सुधारित चिन्हे आणि वेंडिंग किऑस्क अशा बाबींनी सज्ज आहे . याशिवाय, नवीन पादचारी अंडरपास, सुधारित पार्किंगच्या जागा, नवीन प्रदर्शन फलक आणि रात्रीची सुधारित प्रकाश व्यवस्था ही काही इतर वैशिष्ट्ये आहेत जी नागरिकांना चांगला अनुभव देतील. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर, पावसाच्या पाण्याची साठवण, जलसंवर्धन आणि ऊर्जा-कार्यक्षम प्रकाश व्यवस्था यासारख्या अनेक शाश्वततेच्या (टिकाऊ) वैशिष्ट्यांचा देखील समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाच्या वर्षी २३ जानेवारी रोजी पराक्रम दिनी ज्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले होते, त्याच जागी पंतप्रधानांनी आज अनावरण केलेला नेताजींचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. ग्रॅनाईटचा हा पुतळा आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील नेताजींच्या अतुलनीय योगदानाला समर्पक अशी आदरांजली आहे आणि ते देशावरच्या त्यांच्या ऋणांचे प्रतीक असेल. प्रमुख शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेला, 28 फूट उंचीचा हा पुतळा मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडातून कोरला गेला आहे आणि त्याचे वजन 65 मेट्रिक टन इतके आहे.
एकूणच राजपथापासून कर्तव्यपथाचा प्रवास राजकीय हेतूंमुळे वादळ निर्माण करणारा ठरला असला तरी दिल्लीच्या सौंदर्यात अधिक भर घालणारा नक्कीच ठरला आहे.