मुक्तपीठ टीम
देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रात लवकरच स्थापन होणार आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एमबीए आणि पीजीडीएम महाविद्यालयांमध्ये बदलत्या काळानुसार, तसेच उद्योगांच्या गरजांनुसार अभ्यासक्रमात बदल व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम) संस्थेच्या अकराव्या वार्षिक पदवी प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून टोपे बोलत होते. एमबीए आणि पीजीडीएम अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या २०१८-२०२० या तुकडीच्या ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना टोपे यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्सेस, बिझनेस अनॅलिटीक्स आणि ऑपरेशन्स यांसारख्या शाखांमधील होते.
प्रसंगी ‘पीआयबीएम’चे संस्थापक अध्यक्ष रमण प्रीत, आयआयएम अहमदाबादचे माजी संचालक प्रा. जहार शहा, मोतीलाल ओसवाल होम लोनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद हाली आणि स्टॅलियन ऑटो केके लिमिटेड, नायजेरियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष रोहतगी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, मुंबईचे मुख्य नेतृत्व आणि विविधता अधिकारी डॉ. रितू आनंद, आयडीबीआय बँकेचे कार्यकारी संचालक नागराज गरला, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे संस्थापक आणि सीईओ भास्कर बाबू रामचंद्रन आणि पॉलीकॅब इंडिया लिमिटेड, मुंबईचे उप व्यवस्थापकीय संचालक विवेक शर्मा व अन्य सुप्रसिद्ध कंपन्यांमधील प्रख्यात उद्योगपती आदी उपस्थित होते.
राजेश टोपे म्हणाले, “आपण काळाच्या मागे असलेला अभ्यासक्रम शिकवत असू, तर त्याला काही अर्थ नाही. विद्यार्थी पदवी घेऊन उत्तीर्ण होतील, परंतु ते बेरोजगार राहतील. शिक्षणासोबत विविध कौशल्यांचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे. अनुभव आणि शिक्षण हे कळीचे मुद्दे आहेत. विद्यार्थ्यांनी नैतिकता, नितीमत्ता, नम्रता आणि तत्त्वे ही जीवनमूल्ये अंगिकारावी. शॉर्टकटच्या मार्गाने यशप्राप्तीचा दृष्टीकोन नसावा. करियरसोबतच सामाजिक बांधिलकी, दयाळूपणा आणि शांतताप्रिय, प्रामाणिकपणा असावा.”
रमण प्रीत यांनी ‘पीआयबीएम’चा प्रवास मांडला. ते म्हणाले, २००७ पासून गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची परंपरा जपली आहे. पाच शैक्षणिक संस्थांतून भारतातील विद्यार्थी येथे उच्च दर्जाचे शिक्षण घेत आहेत. विविध उद्योग समूहांशी संस्था संलग्न आहे. आता पुण्यात कौशल्य विद्यापीठ, तसेच डिजिटल विद्यापीठ सुरू करण्याचा आमचा विचार आहे.”
“योग्य प्रस्ताव घेऊन आल्यास ही दोन्ही विद्यापीठे स्थापन करण्याची ग्वाही देतो. डिजिटल विद्यापीठाला उज्ज्वल भवितव्य आहे. ही कल्पना अस्तित्वात आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल.” – राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य