मुक्तपीठ टीम
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याच प्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
मेडिकल ऑक्सिजनबाबत
राज्यात कोरोना रूग्ण संख्या झपाट्याने वाढलेली आहे. या रूग्णांवर उपचारासाठी मेडिकल ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे राज्यात उत्पादित होणारे आणि इतर राज्यातून प्राप्त होणारे ऑक्सिजन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सुरळीतपणे व त्या-त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यातील लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन उत्पादकांना त्यांनी दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन पुरवावा यासाठी पुरवठा बाबतचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादकांना देण्यात येते. ६ मे २०२१ साठी प्रशासनाने उत्पादकांना १७१३ टन ऑक्सिजन पुरवण्यासाठी पुरवठा विवरणपत्र जारी केले आहे .
४ मे, २०२१ रोजी राज्यात १७२० टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना करण्यात आला. यामध्ये परराज्यातून प्राप्त झालेल्या २५७.५ टन ऑक्सिजनचा अंतर्भाव आहे. गुजरात येथून ११६.५ टन, भिलाई छत्तीसगड येथून ६० टन आणि बेल्लारी कर्नाटका येथून ८१ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाले आहे.
५ मे २०२१ साठी उत्पादक १६६१ टन ऑक्सिजन वितरीत करणार आहेत. असे उत्पादकांकडून प्राप्त प्रस्तावित वितरण पत्रावरून दिसून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाव्दारे व शासनाद्वारा या कामी नेमलेल्या नोडल ऑफिसर्स द्वारा राज्यातील सर्व जिल्ह्यांना वेळेत ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत.
रेमडेसिवीर बाबत
रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन मे. सिप्ला, हेटेरो, झायडस, मायलन, सन फार्मा, डॉ.रेड्डीज व जुबिलंट या औषध उत्पादक कंपन्यामार्फत करण्यात येते. राज्यात मे. सिप्ला लि. या उत्पादकाचे उत्पादन होते. वरील उत्पादकांच्या प्रामुख्याने भिवंडी, पुणे व नागपूर येथील डेपोमधून या औषधाचा पुरवठा राज्यभर करण्यात येतो.
राज्य शासनाद्वारे राज्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वाढीव कोटा मिळावा यासाठी नियमितपणे पाठपुरावा करण्यात येत होता. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्यांचे पत्र १ मे, २०२१ अन्वये महाराष्ट्र राज्यासाठी वरील सात उत्पादक मिळून एकूण ८,०९,५०० रेमडेसिवीरचा साठा २१ एप्रिल २०२१ ते ९ मे २०२१ या कालावधीत मंजूर केलेला आहे.
२१ एप्रिल २०२१ ते ४ मे २०२१ अखेर पर्यंत ४७४७९१ इतका साठा खासगी व शासकीय रूग्णालयांना वितरीत करण्यात आला आहे. ४ मे २०२१ रोजी राज्यात ४२०२४ इतका साठा वितरीत झाला आहे. ५ मे २०२१ रोजीच्या वितरणासाठी अंदाजे ५०,३८० इतका साठा उत्पादकाकडून प्राप्त झाला आहे. त्यातील काही साठा आज व उर्वरीत साठा ६ मे २०२१ रोजी प्रत्यक्ष वितरीत होणार आहे.