मुक्तपीठ टीम
कवयित्री आणि लेखिका राजश्री बने यांनी लिहिलेल्या ‘आठवणींचं पिंपळपान’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पद्मश्री वामन केंद्रे यांच्या हस्ते पार पडले. दक्षिण मुंबईतील ‘रूपरंग डोंगरी’ संस्थेच्या प्रदीर्घ सामाजिक कार्याचा इतिहास या पुस्तकात मांडण्यात आला आहे. या संस्थेच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त शिवाजी मंदिराच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या समारंभाला पद्मश्री अॅड. उज्ज्वल निकम, पद्मश्री अनुप जलोटा, डॉ. अरुण सावंत, माजी कुलगुरू राजस्थान विद्यापीठ व मुंबई विद्यापीठ, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त अॅड. धनंजय वंजारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. “हे पुस्तक म्हणजे कथा, कादंबरी नसून एका संस्थेचा ५० वर्षांचा सामाजिक, सांस्कृतिक आलेख आहे. भविष्यात या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना, कार्यकर्त्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरणारे आहे” अशा भावना लेखिका राजश्री बने यांनी व्यक्त केल्या.
लेखिका राजश्री या संस्थेच्या उपाध्यक्ष असल्याने गेली ४६ वर्षे संस्थेच्या माध्यमांतून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मुंबई, ग्रामीण भागात कार्य करत आहेत. त्यामुळे पुस्तकाचे लेखन एक साक्षीदार या नात्याने त्यांनी समर्थपणे पेलले आहे. ‘रूपरंग प्रकाशन’तर्फे या पुस्तकाची निर्मिती झाली असून या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ‘रूपरंग’चे अध्यक्ष विनायक राणे उपस्थित होते.